स्टेट बॅंक ऑफ इंडियाकडून नेपाळमध्ये "डिजिटल व्हिलेज'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

काठमांडू - स्टेट बॅंक ऑफ इंडियाने नेपाळमध्ये "डिजिटल व्हिलेज' उपक्रमांतर्गत एका गावाचा कायापालट केला आहे. या गावातील सर्व व्यवहार डिजिटल पद्धतीने करण्यास सुरवात झाली आहे.

काठमांडू - स्टेट बॅंक ऑफ इंडियाने नेपाळमध्ये "डिजिटल व्हिलेज' उपक्रमांतर्गत एका गावाचा कायापालट केला आहे. या गावातील सर्व व्यवहार डिजिटल पद्धतीने करण्यास सुरवात झाली आहे.

काठमांडूपासून पूर्वेला 25 किलोमीटर अंतरावर जारीसिंगपौवा हे गाव आहे. या गावात "डिजिटल व्हिलेज' उपक्रम राबविण्यात आला आहे. या गावात पैसे काढणे व भरण्यासाठी स्वयंचलित यंत्र बसविण्यात आले आहे. या गावातील नागरिकांना 430 डेबिट कार्डचे वितरण करण्यात आले आहे. हे गाव डोंगराळ भागात असल्याने काठमांडूपासून नजीक असूनही त्याचा फारसा अन्य भागाशी संपर्क नाही. त्यामुळे येथील नागरिकांना आर्थिक व्यवहार करण्यात अडचणी येत होत्या. डिजिटल व्यवहारांमुळे त्यांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत.

गावातील डिजिटल केंद्राचे उद्‌घाटन नेपाळ राष्ट्र बॅंकेचे गव्हर्नर चिरंजिवी नेपाळ आणि स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांच्या हस्ते झाले. या गावातील रस्त्यावर सौरऊर्जेवरील दिवेही लावण्यात आले आहेत. स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या नेपाळमधील सेवेला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत.