"मुस्लिम उम्मा'त हस्तक्षेप करु नका: दहशतवादी

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

आम्ही दुबळे नाही, हे लक्षात ठेवा. मुस्लिमांनी हल्ले करुन नयेत, असे तुम्हाला वाटत असल्यास शांतता प्रस्थापित करा. मुस्लिमांना शांतता लाभू दिल्याशिवाय आम्ही तुम्हाला रात्रीची झोप घेऊ देणार नाही

नवी दिल्ली - अमेरिकेमधील "ओहिओ स्टेट युनिव्हर्सिटी' येथे दहशतवादी हल्ला घडविणाऱ्या सोमाली दहशतवाद्याने हल्ल्याआधी काही मिनिटांपूर्वी अल कायदा या जागतिक दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या दहशतवाद्याची स्तुती करत अमेरिकेस मुस्लिम जगतापासून लांब राहण्याचा इशारा दिल्याची माहिती येथील सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली.

"मी आता सहन करुच शकत नाही. अमेरिका, इतर देशांमध्ये विशेषत: मुस्लिम उम्मामध्ये (बंधुवत समाज) हस्तक्षेप करणे थांबवा. आम्ही दुबळे नाही, हे लक्षात ठेवा. मुस्लिमांनी हल्ले करुन नयेत, असे तुम्हाला वाटत असल्यास शांतता प्रस्थापित करा. मुस्लिमांना शांतता लाभू दिल्याशिवाय आम्ही तुम्हाला रात्रीची झोप घेऊ देणार नाही,'' असा संदेश अब्दुल रझाक अली अर्तान या हल्लेखोराच्या फेसबुक पेजवर दिसून आला आहे.

अर्तान याने काल या विद्यापीठाच्या परिसरामध्ये अचानक हल्ला घडवित 11 जणांना भोसकले होते. या 11 जणांपैकी कोणासही गंभीर दुखापत झालेली नाही. यानंतर अर्तान याला तत्काळ गोळी घालून ठार करण्यात आले होते.
अर्तान हा सोमाली निर्वासित होता. काही काळ पाकिस्तानमध्ये राहिलेला अर्तान हा 2014 मध्ये अमेरिकेचे कायमस्वरुपी नागरिकत्व मिळवून येथे रहावयास आला होता.