विस्तारवादी चीनचे तैवानला भय

वृत्तसंस्था
बुधवार, 15 मार्च 2017

चिनी जेट विमाने व युद्धनौकांच्या तैवानजवळील हालचालींमधून तैवानला असलेला धोका आणखी गंभीर झाल्याचे स्पष्ट आहे. तसेच तैवानला जाणवत असलेल्या लष्करी धोक्‍यासहच यामुळे दक्षिण पूर्व आशियातील प्रादेशिक शांततेवरही नकारात्मक परिणाम होणार आहे

तैपेई - चीनकडून अवंबिण्यात आलेली सैन्याच्या आधुनिकीकरणाची आक्रमक मोहिम आणि चिनी युद्धनौका व लढाऊ विमानांच्या तैवानजवळील वाढत्या हालचालींच्या पार्श्‍वभूमीवर तैवानला "धोका' असल्याचे मत येथील संरक्षण मंत्रालयाच्या एका अहवालामधून व्यक्त करण्यात आले आहे. याच अहवालामध्ये अमेरिकेची दक्षिण पूर्व आशियासंदर्भातील धोरणात्मक अनिश्‍चितता, जपानकडून वाढविण्यात येणारे लष्करी सामर्थ्य आणि दक्षिण चिनी समुद्रामधील तणावग्रस्त परिस्थितीसंदर्भातील संवेदनशील निरीक्षणेही नोंदविण्यात आली आहेत.

""चिनी जेट विमाने व युद्धनौकांच्या तैवानजवळील हालचालींमधून तैवानला असलेला धोका आणखी गंभीर झाल्याचे स्पष्ट आहे. तसेच तैवानला जाणवत असलेल्या लष्करी धोक्‍यासहच यामुळे दक्षिण पूर्व आशियातील प्रादेशिक शांततेवरही नकारात्मक परिणाम होणार आहे,'' असे मत या अहवालाच्या माध्यमामधून व्यक्त करण्यात आले आहे.

हा अहवाल तैवानचे संरक्षण मंत्री फेंग शिह-कुआन हे येथाल संसदेमध्ये मांडणार आहेत. तैवान हा चीनचाच भाग असून वेळ पडल्यास बळाचा वापर करुन तो पुन्हा चीनला जोडण्यात येईल, अशी चीनची अधिकृत भूमिका आहे. या पार्श्‍वभूमीवर तैवानच्या नेतृत्वाची वाढती चिंता अधोरेखित करणारा हा अहवाल अत्यंत महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे.

टॅग्स