सिंधू पाणी करार : भारतीय शिष्टमंडळ पाकमध्ये दाखल

वृत्तसंस्था
सोमवार, 20 मार्च 2017

माध्यमांचे प्रतिनिधी वाघा सीमेवर आले होते, परंतु त्यांना शिष्टमंडळाला भेटण्याची परवानगी देण्यात आली नाही.

नवी दिल्ली : सिंधू पाणी करारावरील वादांवर तोडगा काढण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सिंधू आयोगाच्या बैठकीसाठी 10 भारतीय अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ आज (सोमवार) पाकिस्तानमध्ये दाखल झाले. 

पाकिस्तानचे वरिष्ठ अधिकारी आणि भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांनी वाघा सीमेवर भारतीय शिष्टमंडळाचे स्वागत केले. माध्यमांचे प्रतिनिधी वाघा सीमेवर आले होते, परंतु त्यांना शिष्टमंडळाला भेटण्याची परवानगी देण्यात आली नाही. तिथून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये हे शिष्टमंडळ भूमार्गानेच राजधानी इस्लामाबादकडे रवाना झाले. 

इस्लामाबाद येथे ही दोनदिवसीय बैठक आजपासून (ता. 20) सुरू होत आहे. सिंधू आयोगाचे भारतातील आयुक्त पी. के. सक्‍सेना यांच्या नेतृत्वाखाली दहाजणांचे शिष्टमंडळ या बैठकीमध्ये सहभागी होणार आहे. या बैठकीमध्ये पाणीवाटप करारानुसार भारताला मिळालेल्या हक्कांची जाणीव पाकिस्तानला करून देण्याचा भारत सरकारचा उद्देश आहे.