ब्रिटनच्या पंतप्रधान पुढील महिन्यात भारतात 

पीटीआय
शनिवार, 8 ऑक्टोबर 2016

ब्रिटनबरोबर मुक्त व्यापार करार करण्यासाठी भारतासह कॅनडा, चीन, मेक्‍सिको, सिंगापूर आणि दक्षिण कोरियाने उत्सुकता दर्शविली आहे. तसेच, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाबरोबरही हे करार करण्याची सुरवातही झाली आहे.

लंडन : ब्रिटनच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्यानंतर थेरेसा मे या पुढील महिन्यात भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान म्हणून पहिल्याच भारत दौऱ्याच्या तपशीलांवर चर्चा सुरू आहे, असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. 

राजधानी नवी दिल्लीमध्ये पुढील महिन्यात 7 ते 9 नोव्हेंबर या कालावधीत 'भारत-ब्रिटन टेक-समिट' होणार आहे. याच कालावधीमध्ये थेरेसा मे भारतात येण्याची शक्‍यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ब्रिटन दौऱ्यात केलेल्या घोषणांमध्ये या द्विपक्षीय तंत्रज्ञानविषयक चर्चासत्राचाही समावेश होता. 

जूनमध्ये झालेल्या 'ब्रेक्‍झिट'विषयीच्या मतदानानंतर ब्रिटनने युरोपीय समुदायातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी राजीनामा दिला. यानंतर थेरेसा मे यांनी पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली. 'युरोपीय समुदायाबाहेरील ब्रिटनचा विश्‍वासार्ह मित्र' अशा शब्दांत थेरेसा मे यांनी भारताचे वर्णन केले होते. ब्रिटनबरोबर मुक्त व्यापार करार करण्यासाठी भारतासह कॅनडा, चीन, मेक्‍सिको, सिंगापूर आणि दक्षिण कोरियाने उत्सुकता दर्शविली आहे. तसेच, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाबरोबरही हे करार करण्याची सुरवातही झाली आहे. 

या पार्श्‍वभूमीवर थेरेसा मे यांचा भारत दौरा द्विपक्षीय व्यापार संबंधांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या दौऱ्यात त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्र्यांचीही भेट घेण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: Theresa May to visit India in November