इजिप्तमध्ये 3 महिने आणीबाणी; इसिसच्या हल्ल्यानंतर केली घोषणा

वृत्तसंस्था
सोमवार, 10 एप्रिल 2017

अल्पसंख्यांकावर अलीकडच्या काळात झालेला हा सर्वांत भीषण हल्ला आहे. 

कैरो : इजिप्तमधील दोन चर्चमध्ये झालेल्या दहशतवादी बाँब हल्ल्यांमध्ये किमान 45 लोक मृत्युमुखी पडले आहेत, तर 120 जण जखमी झाले आहेत. इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांनी तीन महिन्यांची आणीबाणी जाहीर केली आहे. 

तांता आणि अॅलेक्झांड्रिया या शहरांमध्ये रविवारी हे बाँबस्फोट झाले. त्यानंतर अध्यक्ष सिसी यांनी अध्यक्षीय निवासस्थानी राष्ट्रीय संरक्षण परिषदेची बैठक घेतली. त्यावेळी बोलताना त्यांनी तीन महिन्यांसाठी आणीबाणीची परिस्थिती जाहीर केली. 

येथे अल्पसंख्यांक असणारे ख्रिश्चन 'पाम संडे'चा सण साजरा करण्यासाठी चर्चमध्ये जमले असताना हा हल्ला करण्यात आला. 'पाम संडे'चा दिवस ख्रिश्चन धर्मातील सर्वांत पवित्र दिवसांपैकी एक मानला जातो. 
 इस्लामिक स्टेट तथा इसिसने घडवून आणलेल्या या शक्तिशाली बाँबस्फोटांमध्ये किमान 45 जणांचा बळी गेला असून, सव्वाशे लोक जखमी झाले आहेत. अल्पसंख्यांकावर अलीकडच्या काळात झालेला हा सर्वांत भीषण हल्ला आहे. 

या आणीबाणीच्या घोषणेसोबतच सर्व कायदेशीर व घटनात्मक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर योग्य ती पाऊले उचलण्यात येतील, असे अध्यक्ष सिसी यांनी सांगितले.