तीन अमेरिकन शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्रातील यावर्षीचे नोबेल

वृत्तसंस्था
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

वनस्पती, मानव वा प्राणी त्यांच्या शरीरांमधील जैविक प्रक्रिया पृथ्वीच्या परिवलनाशी कशा प्रकारे जुळवून घेतात, हे या संशोधनामुळे स्पष्ट होते. सजीवांमधील हे "अंतर्गत घड्याळ' कशा प्रकारे काम करते, हे या शास्त्रज्ञांनी या संशोधनामधून दाखवून दिले आहे

ऑस्लो - वैद्यकशास्त्रामधील या वर्षीचे नोबेल पारितोषिक जेफ्री सी हॉल, मायकेल रोसबॅश आणि मायकेल डब्ल्यू यंग या तीन अमेरिकन शास्त्रज्ञांना जाहीर झाले आहे.

मानवी शरीरामध्ये सुमारे 24 तासांपर्यंत चालत असलेल्या जैविक प्रक्रिया (सर्केडियन सिस्टीम्स) नियंत्रित करत असलेल्या "मॉलिक्‍युलर मेकॅनिझम'संदर्भात या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनामुळे त्यांना नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले आहे.

"वनस्पती, मानव वा प्राणी त्यांच्या शरीरांमधील जैविक प्रक्रिया पृथ्वीच्या परिवलनाशी कशा प्रकारे जुळवून घेतात, हे या संशोधनामुळे स्पष्ट होते. सजीवांमधील हे "अंतर्गत घड्याळ' कशा प्रकारे काम करते, हे या शास्त्रज्ञांनी या संशोधनामधून दाखवून दिले आहे,'' असे नोबेल पारितोषिक समितीने म्हटले आहे. या शास्त्रज्ञांनी या संशोधनासाठी फळांवर बसणाऱ्या माशांचा (फ्रुट फ्लाईज) वापर केला होता.

दरवर्षी सर्वप्रथम वैद्यकशास्त्र क्षेत्रामधील नोबेल पारितोषिकाची घोषणा प्रथम केली जाते. यानंतर विज्ञान, साहित्य आणि जागतिक शांतता या क्षेत्रांतील कार्यासाठीही नोबेल प्रदान केले जाते.