अमेरिकेने तिबेटची मदत रोखली

वृत्तसंस्था
शनिवार, 27 मे 2017

तिबेटी समुदायाला मदत करण्यासाठी जगातील इतर देशांनी पुढे यावे, असे ट्रम्प प्रशासनाचे म्हणणे आहे.

वॉशिंग्टन : तिबेटी नागरिकांना पुढील वर्षासाठी दिली जाणारी मदत शून्यावर आणण्याचा निर्णय अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने घेतला आहे. तिबेटी समुदायाला आपली वैशिष्ट्यपूर्ण ओळख कायम ठेवण्यासाठी अमेरिकेकडून प्रतिवर्षी मोठी मदत केली जाते.

मात्र, पुढील वर्षीच्या अर्थसंकल्पात तिबेटला दिली जाणारी मदत शून्यावर आणण्याचा प्रस्ताव आहे. तिबेटी समुदायाला मदत करण्यासाठी जगातील इतर देशांनी पुढे यावे, असे ट्रम्प प्रशासनाचे म्हणणे आहे.

चीनमधील कम्युनिस्ट राजवटीच्या विरोधात 1959 मध्ये तिबेटने उठाव केला होता. तेव्हापासून तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा यांनी भारतात आश्रय घेतला आहे. तिबेटची मदत रोखण्याच्या निर्णयावर अमेरिकी कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे.