ट्रम्प यांच्याकडून विजयी मोदींचे अभिनंदन

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 मार्च 2017

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीतील यशाबद्दल मोदी यांचे ट्रम्प यांच्याकडून करण्यात आलेले अभिनंदन हे दोन नेत्यांमधील भविष्यातील भेटीमध्ये अधिकाधिक सकारात्मक चर्चा होण्यासंदर्भातील स्पष्ट चिन्ह असल्याचे मानले जात आहे

वॉशिंग्टन - उत्तर प्रदेश राज्यामधील निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षास (भाजप) मिळालेल्या यशाबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. ट्रम्प यांच्याकडून मोदी यांना यासंदर्भात दूरध्वनी करण्यात आल्याची माहिती व्हाईट हाऊसचे माध्यम सचिव सीन स्पाईसर यांनी दिली आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेच्या नेतृत्वाची सूत्रे स्वीकारल्यानंतर भारतीय पंतप्रधानांशी दूरध्वनीच्या माध्यमामधून झालेली ही तिसरी चर्चा आहे.

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीतील यशाबद्दल मोदी यांचे ट्रम्प यांच्याकडून करण्यात आलेले अभिनंदन हे दोन नेत्यांमधील भविष्यातील भेटीमध्ये अधिकाधिक सकारात्मक चर्चा होण्यासंदर्भातील स्पष्ट चिन्ह असल्याचे मानले जात आहे. अमेरिकेचे याआधीचे दोन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश व बराक ओबामा यांच्या कार्यकाळात भारत व अमेरिकेमधील दृढ झालेले राजनैतिक संबंध ट्रम्प यांच्या कार्यकाळात अधिक बळकट व्हावेत, यासाठी दोन्हीकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल व परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी या पार्श्‍वभूमीवर ट्रम्प प्रशासनाचा भारतासंदर्भातील कल जाणून घेण्यासाठी अमेरिका दौरे केले आहेत.

आत्तापर्यंत झालेल्या चर्चेत दोन्ही नेत्यांनी एकमेकांना मायदेशी येण्याचे औपचारिक निमंत्रण दिले आहे. या पार्श्‍वभूमीवर, ट्रम्प व मोदी यांच्यामध्ये पुन्हा झालेली चर्चा अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहे.

Web Title: Trump congratulates Modi on UP success