ट्रम्प मे महिन्यात नाटो राष्ट्रप्रमुखांना भेटणार

वृत्तसंस्था
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

पुतीन यांच्याशी सहकार्य करण्यासंदर्भात ट्रम्प यांनी घेतलेल्या भूमिकेवर याआधीच अमेरिकेमधून मोठी टीका करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर, नाटोसंदर्भातील ट्रम्प यांचे धोरण अत्यंत संवेदनशील मानले जात आहे

वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे येत्या मे महिन्यात "नाटो' आघाडीच्या युरोपमधील राष्ट्रप्रमुखांची भेट घेणार असल्याची माहिती नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टोल्टेनबर्ग यांनी दिली. ट्रम्प यांच्याशी यासंदर्भात दूरध्वनीवरुन झालेल्या चर्चेमध्ये पूर्व युक्रेनमधील बंडखोर चळवळीसंदर्भातही चर्चा झाल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

""ट्रम्प यांनी नाटोमधील राष्ट्रप्रमुखांची येत्या मे महिन्यात भेट घेण्यास मान्यता दर्शविली. युक्रेनमधील सीमारेषेजवळ सध्या सुरु असलेल्या संघर्षावर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध पर्यायांसंदर्भातही यावेळी चर्चा झाली,'' असे निवेदन व्हाईट हाऊसतर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे.

गेल्या आठवड्यात युक्रेनचे सैन्य व रशियाचा पाठिंबा असलेले बंडखोर यांच्यामध्ये नव्याने संघर्षास सुरुवात झाली आहे. दोन्ही बाजुंनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले असून या संघर्षात आत्तापर्यंत 40 जण ठार झाले आहेत. पुतीन यांच्याशी सहकार्य करण्यासंदर्भात ट्रम्प यांनी घेतलेल्या भूमिकेवर याआधीच अमेरिकेमधून मोठी टीका करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर, नाटोसंदर्भातील ट्रम्प यांचे धोरण अत्यंत संवेदनशील मानले जात आहे.