ट्रम्प यांनीही ओबामांप्रमाणे रडावयास शिकावे!

वृत्तसंस्था
बुधवार, 18 जानेवारी 2017

ट्रम्प यांच्या शपथविधीवेळी ते जर एखादा अश्रु ढाळू शकले; तर लोकांची भावना त्याच्याकडे चटकन वळविण्यात ते यशस्वी ठरतील. राजकीय नेत्यांसाठी अश्रु हे एक मोठे अस्त्र आहे...

पॅरिस - अमेरिकेचे होणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सध्याचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याप्रमाणे रडता येणे आवश्‍यक असल्याचे मत प्रसिद्ध ब्रिटीश वर्तन तज्ज्ञ (बिहेव्हियर एक्‍सपर्ट) ज्युडी जेम्स यांनी व्यक्त केले आहे.

"ट्रम्प यांच्या शपथविधीवेळी ते जर एखादा अश्रु ढाळू शकले; तर लोकांची भावना त्याच्याकडे चटकन वळविण्यात ते यशस्वी ठरतील. राजकीय नेत्यांसाठी अश्रु हे एक मोठे अस्त्र आहे. आणि ट्रम्प यांच्यासाठी तर रडणे अत्यंत लाभदायी ठरेल,'' असे जेम्स यांनी म्हटले आहे. जेम्स या "दी बॉडी लॅंग्वेज बायबल' या पुस्तकाच्या लेखिका आहेत.

भावनांचे प्रदर्शन करण्याची योजना ओबामांसाठी अत्यंत यशस्वी ठरल्याचे निरीक्षणही त्यांनी यावेळी मांडले. ओबामा यांच्या भावूक होण्यामधून विचारवंत म्हणून प्रतिमा तयार होण्याबरोबरच ते जनमानसाशी थेट भावनिक संपर्क प्रस्थापित करण्यात यशस्वी ठरले, असे जेम्स यांनी स्पष्ट केले. ओबामा यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर किमान 10 वेळा कॅमेऱ्यासमोर अश्रुपात केला आहे.

ट्रम्प हे येत्या 20 जानेवारी रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.