'उबर'च्या गुंतवणूकदारांमध्ये धूसफूस 

वृत्तसंस्था
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

शेरपा कॅपिटल, युकैपा कंपनीज आणि ऍडम लेबेर या तीन गुंतवणूकदार कंपन्यांनी बेन्चमार्कने उबरमधील हिस्सा विकावा, अशी मागणी केली आहे. बेन्चमार्कने उबरचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी कलानिक यांच्याविरोधात खटला दाखल केल्याने कंपनीची प्रतिमा खराब झाली आहे.

सॅन फ्रान्सिस्को : ऑनलाइन प्रवासी टॅक्‍सी सेवा कंपनी "उबर'च्या गुंतवणूकदारांमध्ये वाद निर्माण झाले आहेत. बेन्चमार्क कॅपिटल या गुंतणूकदार कंपनीने उबरचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी ट्रॅव्हिस कलानिक यांच्याविरोधात खटला दाखल केला असून, बेन्चमार्क कंपनीलाच बाहेर काढण्याचा इशारा अन्य तीन गुंतवणूकदार कंपन्यांनी दिला आहे. 

शेरपा कॅपिटल, युकैपा कंपनीज आणि ऍडम लेबेर या तीन गुंतवणूकदार कंपन्यांनी बेन्चमार्कने उबरमधील हिस्सा विकावा, अशी मागणी केली आहे. बेन्चमार्कने उबरचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी कलानिक यांच्याविरोधात खटला दाखल केल्याने कंपनीची प्रतिमा खराब झाली आहे. यामुळे उबरचे बाजारमूल्य, निधी उभारणीचे प्रयत्न आणि नव्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा शोध यांना बाधा पोचली असल्याचे या गुंतवणूकदारांनी म्हटले आहे. कंपनीच्या संचालक मंडळाला या तीन गुंतवणूकदारांनी यासंदर्भात ई-मेल केला आहे. या ई-मेलमध्ये म्हटले आहे, की बेन्चमार्कने खटला दाखल केल्यामुळे कंपनीचे मूल्य वाढण्याऐवजी कमी होणार आहे. बेन्चमार्कचे हे पाऊल चुकीचे आहे. 

कलानिक यांना संचालक मंडळातून हटविण्याची मागणी करणारा खटला बेन्चमार्कने दाखल केला आहे. यात कलानिक यांनी अनेक गैरप्रकार केले असून, अधिकार स्वत:कडे ठेवण्यासाठी कट आखल्याचे म्हटले आहे. त्यांनी जूनमध्ये राजीनामा दिल्यानंतर हे प्रकार सुरू होते, असा आरोपही केला आहे.