गृहपाठ म्हणून लिहावयास सांगितली "सुसाईड नोट'

वृत्तसंस्था
रविवार, 25 जून 2017

"लेडी मॅकबेथ' हे या नाटकामधील एक पात्र स्वत:चे आयुष्य संपवितानाचा एक प्रसंग नाटकामध्ये आहे. हा प्रसंग शिकविताना संबंधित शिक्षिकेकडून विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रियजनांना वाचण्यासाठी एक "सुसाईड नोट' लिहून आणावी, असा गृहपाठ देण्यात आला होता

लंडन - जगप्रसिद्ध नाटककार शेक्‍सपिअर यांच्या "मॅकबेथ' या विख्यात नाटकावर आधारित असलेला अभ्यासक्रम शिकविणाऱ्या एका ब्रिटीश शिक्षिकेने विद्यार्थ्यांना दिलेल्या गृहपाठामुळे येथे खळबळ उडाली आहे.

लंडनमधील थॉमस टॅलिस या शाळेमध्ये शिकविणाऱ्या या शिक्षिकेकडून 60 विद्यार्थ्यांना "सुसाईड नोट' लिहिण्याचा गृहपाठ देण्यात आला होता. "लेडी मॅकबेथ' हे या नाटकामधील एक पात्र स्वत:चे आयुष्य संपवितानाचा एक प्रसंग नाटकामध्ये आहे. हा प्रसंग शिकविताना संबंधित शिक्षिकेकडून विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रियजनांना वाचण्यासाठी एक "सुसाईड नोट' लिहून आणावी, असा गृहपाठ देण्यात आला होता.

यामुळे या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये अत्यंत संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. हा गृहपाठ म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस असल्याची भावना व्यक्त करत पालकांनी या प्रकरणी त्वरित माफी मागण्यात यावी, अशी मागणी केली होती. या पार्श्‍वभूमीवर, शाळेच्या मुख्याध्यापिका कॅरोलिन रॉबर्टस यांनीही या प्रकरणी शाळा प्रशासनाच्या वतीने पालकांची बिनशर्त माफी मागितली आहे.