राष्ट्रसंघाच्या सरचिटणीसांना जागतिक दहशतवादाची चिंता

पीटीआय
गुरुवार, 5 जानेवारी 2017

आंतरराष्ट्रीय समुदाय सध्या ज्या आव्हानांचा सामना करत आहे, त्यावर देशांना वेगवेगळे राहून तोडगा काढता येणार नाही, हे आपण समजून घेण्याची गरज आहे. त्यासाठी निश्‍चितच बहुपक्षीय कारवाई आवश्‍यक आहे.

न्यूयॉर्क - संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी जगातील वाढत्या संघर्ष आणि दहशतवादाच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली. मी चमत्कार करणारी व्यक्ती नाही. दहशतवादाचा सामना करण्यासाठी जगभरातील देशांनी एकजूट दाखवावी, असे आवाहन त्यांनी केले.
 

बान की मून यांच्या जागी संयुक्त राष्ट्रसंघात सरचिटणीसपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी कर्मचाऱ्यांशी बोलताना 67 वर्षीय गुटेरेस म्हणाले, की आपण अतिशय आव्हानात्मक काळाचा सामना करत आहोत, याविषयी कोणालाच शंका असण्याचे कारण नाही. एका बाजूला आपण पाहतो, की संपूर्ण जगात संघर्ष वाढत आहे आणि तो एकमेकांशी जोडला गेलेला आहे. या घटनांनी एक प्रकारच्या नव्या जागतिक दहशतवादाला जन्म दिला असून, यामध्ये आंतरराष्ट्रीय मानवी नियमांचा आदर राखला जात नाही. अशा परिस्थितीत आपल्याला मोठ्या प्रमाणावर मानवाधिकारांचा भंग पाहायला मिळत आहे. एवढेच नव्हे; तर काही वर्षांपूर्वी ज्याप्रमाणे निर्वासितांचा सन्मान होत होता, तोसुद्धा नियमांप्रमाणे होत नाही.

संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस म्हणून माझी निवड झाल्यामुळे मोठ्या अपेक्षा बाळगल्या जात आहेत. मात्र, हा कोणताही चमत्कार नाही, असेही गुटेरेस यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, की मी चमत्कार करणारी व्यक्ती नाही, हे सुरवातीला स्पष्ट करतो. आपण एक संघ म्हणून काम केले तरच आपण आपले लक्ष्य गाठू शकतो आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिकारात महान तत्त्वांची सेवा करण्यासाठी लायक बनू शकतो. आपण जे काही करतो त्याला जोडणारा एक दुवा असतो आणि तो "लोक' असतात, हे समजण्यात देश अपयशी ठरले आहेत. लोक अविभाजित आहेत आणि आपण संयुक्त राष्ट्रसंघात विविध क्षेत्रांत पाहतो, की ज्यामध्ये काम करायचे आहे त्या वेळी आपल्याला एकजुटीची आवश्‍यकता पडते. कारण लोकांपर्यंत ती गोष्ट एकजुटीनेच पोचते.

 

Web Title: UN General Secretary worried over terrorism