ट्रम्प यांनी सांगितल्यास चीनवर अण्वस्त्र हल्ला करु: अमेरिकन नौदलाधिकारी

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 जुलै 2017

मेरिकेच्या सैन्याच्या प्रत्येक सदस्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व आमच्या वरिष्ठांच्या आज्ञा पाळण्याची शपथ घेतली आहे. अमेरिकन लोकशाहीचा हाच गाभा आहे. किंबहुना, या मूलभूत तत्त्वाचे पालन करण्यात न आल्यास खरी समस्या उद्‌भवेल

कॅनबेरा - राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आदेश मिळाला तर पुढील आठवड्यात चीनवर अण्वस्त्र हल्ला करु, असे संवेदनशील विधान अमेरिकेच्या प्रशांत महासागरामधील नौदलाचे मुख्याधिकारी ऍडमिरल स्कॉट स्विफ्ट यांनी केले आहे.

अमेरिका व ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीजवळ झालेल्या लष्करी सरावानंतर आयोजित करण्यात आलेल्या सुरक्षा परिषदेमध्ये स्विफ्ट हे बोलत होते.

या परिषदेमध्ये स्विफ्ट यांना ट्रम्प यांनी आदेश दिल्यास चीनवर अण्वस्त्र हल्ला करणार का, असा प्रश्‍न विचारण्यात आला. यावर स्विफ्ट यांनी तत्काळ यास होकार दिला.

"अमेरिकेच्या सैन्याच्या प्रत्येक सदस्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व आमच्या वरिष्ठांच्या आज्ञा पाळण्याची शपथ घेतली आहे. अमेरिकन लोकशाहीचा हाच गाभा आहे. किंबहुना, या मूलभूत तत्त्वाचे पालन करण्यात न आल्यास खरी समस्या उद्‌भवेल,'' असे स्विफ्ट यांनी स्पष्ट केले.

दक्षिण चिनी समुद्रामधील सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर स्विफ्ट यांचे हे विधान अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहे. या विधानावर चीनकडून संतप्त प्रतिकिया उमटण्याची शक्‍यताही आहे.