चीनवर अमेरिका, ऑस्ट्रेलिया व जपानची कडक शब्दांत टीका

वृत्तसंस्था
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

आंतरराष्ट्रीय व्यापाराचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण मार्ग असलेल्या दक्षिण चिनी समुद्राच्या 90% पेक्षा जास्त भागावर चीन दावा सांगितला आहे. चीनच्या या दांडगाईचा आग्नेय आशियातील राजकारणावर मोठा परिणाम झाला असून येथील राजकारण अत्यंत तणावग्रस्त बनल्याचे मानले जात आहे

दक्षिण चिनी समुद्रामधील या तणावग्रस्त राजकारणाचे पडसाद रोज उमटत असून या पार्श्‍वभूमीवर अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलिया या तीन देशांकडून चीनवर कडक शब्दांत टीका करण्यात आली आहे.

मनिला - दक्षिण चिनी समुद्रामध्ये मोठी कृत्रिम बेटे बांधून या भागाचे लष्करीकरण करण्याच्या चीनच्या धोरणावर अमेरिका, ऑस्ट्रेलिया व जपान या तीन देशांनी कडक टीका केली आहे. चीनकडून बांधण्यात येत असलेल्या या बेटांचा वापर लष्करी तळ म्हणून करता येणे शक्‍य आहे. यामुळे जागतिक राजकारणाच्या दृष्टिकोनामधून अत्यंत संवेदनशील असलेल्या दक्षिण चिनी समुद्र भागावर चीनचे वर्चस्व प्रस्थापित होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर ही टीका करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय व्यापाराचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण मार्ग असलेल्या दक्षिण चिनी समुद्राच्या 90% पेक्षा जास्त भागावर चीन दावा सांगितला आहे. चीनच्या या दांडगाईचा आग्नेय आशियातील राजकारणावर मोठा परिणाम झाला असून येथील राजकारण अत्यंत तणावग्रस्त बनल्याचे मानले जात आहे. मात्र दक्षिण चिनी समुद्रामधील वाद हे द्विपक्षीय वाद असून त्यामध्ये "इतर' देशांनी हस्तक्षेप करु नये, असा इशारा चीनकडून देण्यात आला आहे. आसियान देशांमध्ये फूट पाडण्याचे धोरण चीनकडून प्रभावीरित्या राबविण्यात येत आहे.