‘इसिस’च्या गुहांवर अमेरिकेचा हल्ला

यूएनआय
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

अफगाणिस्तानमधील ‘इसिस’च्या कारवाया रोखण्यासाठी हे अत्यंत अचूकपणे निवडलेले आणि अचूकपणे टाकलेले हे अस्त्र होते. दहशतवाद्यांच्या कारवाया कदापि खपवून घेतल्या जाणार नाहीत.
- शॉन स्पेन्सर, माध्यम सचिव, व्हाइट हाउस

 

वॉशिंग्टन - अमेरिकेने आज अफगाणिस्तानमधील नांगरहार प्रांतातील ‘इसिस’च्या आश्रयस्थानावर सर्वांत मोठा अण्वस्त्ररहित बाँब टाकला. अमेरिकेने हल्ला करताना इतक्‍या मोठ्या बाँबचा प्रथमच वापर केला आहे. बाँबच्या आकारावरून त्याला ‘मदर ऑफ ऑल बाँब्ज्’ असे म्हणतात.

अफगाणिस्तानच्या स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी सात वाजून ३२ मिनिटांनी अमेरिकेने जीबीयू-४३/बी (मॅसिव्ह ऑर्डनन्स एअर ब्लास्ट बाँब) हा बाँब अचिन जिल्ह्यात ‘इसिस’च्या दहशतवाद्यांनी आश्रय घेतलेल्या गुहांवर टाकला. ‘इसिस’मध्ये भरती होऊ इच्छिणाऱ्यांचे प्रशिक्षण येथे दिले जात असल्याचा संशय आहे. अफगाणिस्तानात ‘इसिस’चे एक ते पाच हजार दहशतवादी असण्याचा अहवाल आहे. गेल्या आठवड्यात  नांगरहार येथेच दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत अमेरिकेचा एक सैनिक मारला गेला होता. हा भाग पाकिस्तान सीमेलगतच आहे. अमेरिकेच्या विशेष हवाई पथकाने एमसी-१३० या विमानातून जीपीएसच्या साह्याने हा बाँब टाकला. या बाँबचे वजन २१,६०० पौंड असून, अमेरिकेच्या ताफ्यातील हा सर्वांत शक्तिशाली अण्वस्त्ररहित बाँब आहे. ‘इसिस’ हेच या हल्ल्याचे लक्ष्य होते, असे अमेरिकेतील सूत्रांनी सांगितले. अफगाणिस्तानातील इसिसविरोधात सुरू असलेल्या कारवाईचाच हा भाग असल्याचे आणि हा लढा गंभीरपणे अमेरिकेने घेतल्याचे ‘पेंटॅगॉन’चे प्रवक्ते ॲडम स्टम्प यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. दहशतवाद्यांकडून नागरिकांच्या होणाऱ्या हत्या थांबविण्यासाठीच या हल्ल्याचे नियोजन अनेक दिवसांपूर्वीच झाल्याचेही स्टम्प यांनी सांगितले. या हल्ल्याच्या परिणामांची चाचपणी सुरू असून, ‘इसिस’चे अथवा इतर झालेल्या नुकसानीबाबत रात्री उशिरापर्यंत माहिती उपलब्ध झाली नाही. जीबीयू-४३/बी हा अमेरिकेच्या ताफ्यातील सर्वांत शक्तिशाली अण्वस्त्ररहित बाँब आहे. जीबीयू-४३/बी हा शक्तिशाली बाँब अमेरिकेने इराक युद्धावेळी २००३ मध्ये तयार केला होता आणि त्याची चाचणीही झाली होती. ज्या एमसी-३० या लष्कराच्या मालवाहू विमानातून हा बाँब टाकण्यात आला, ते विमान आधीच अफगाणिस्तानात तैनात करण्यात आले होते. बाँब टाकला त्या ठिकाणी महत्त्वाचे दहशतवादी अथवा मोठ्या प्रमाणावर दहशतवादी असण्याची शक्‍यता असल्यानेच हा बाँब टाकला असण्याची शक्‍यता अमेरिकेच्या निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

असा आहे जीबीयू-43/बी बॉंब 
- वजन : 21,600 पौंड (9,800 किलो) 
- लांबी : 30 फूट 
- स्फोटके : 11 टन 
- क्षमता : 5000 मीटर परिघातील परिसर नष्ट 

Web Title: US attack