अमेरिकेची "प्रयोगशाळा' 

पु. ल. पुरोहित 
मंगळवार, 25 एप्रिल 2017

अमेरिकेने अफगाणिस्तानात अलीकडेच केलेल्या बॉंबहल्ल्यामागे नव्या अस्त्राची रणांगणावर प्रत्यक्ष चाचणी घेण्याचा इरादा असणार. अमेरिकेने यापूर्वीदेखील अशा प्रकारच्या चाचण्या केल्याचे दिसते. 

अमेरिकेने अफगाणिस्तानात अलीकडेच केलेल्या बॉंबहल्ल्यामागे नव्या अस्त्राची रणांगणावर प्रत्यक्ष चाचणी घेण्याचा इरादा असणार. अमेरिकेने यापूर्वीदेखील अशा प्रकारच्या चाचण्या केल्याचे दिसते. 

अफगाणिस्तानच्या आग्नेय भागातील नांगरहार प्रांतातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर महाशक्तिशाली बॉंब टाकून अमेरिकेने "इसिस'ला कितपत हानी पोचविली आहे, हे भविष्यकाळच ठरवेल. परंतु, या हल्ल्यामागे उत्तर कोरियाला खबरदारीचा इशारा निश्‍चितच दिला गेला आहे. म्हणूनच, अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष हमीद करझाई यांनी, 'हा हल्ला अमेरिकेने आपल्या नव्या अस्त्राची रणांगणावर प्रत्यक्ष चाचणी घेण्याच्या इराद्याने केला आहे,' असे म्हटले आहे!

इतिहासाची पाने चाळून पाहता त्यांच्या या मुद्द्यामध्ये पुष्कळ तथ्य असू शकेल! उदाहरणार्थ, दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरच्या पर्वात जपानचे सैन्य आणि आरमार नष्ट झाल्यानंतर त्या देशाचा पराभव निश्‍चित झाला होता. अमेरिकेने तेव्हाच अण्वस्त्र वापराचा बडगा दाखवून जपानपुढे "बिनशर्त शरणागती'चा पर्याय ठेवला असता, तर त्या देशाने थोडीफार घासाघीस करून कदाचित तो मान्यही केला असता. परंतु, त्यामुळे मोठ्या औद्योगिक शहरावर डागलेल्या अण्वस्त्राचा परिणाम काय होईल हे पडताळून पाहता आले नसते. म्हणून "युद्ध समाप्ती'च्या पोकळ सबबीवर अमेरिकेने सहा ऑगस्ट 1945 रोजी हिरोशिमावर पहिला अणुबॉंब टाकला. "युद्ध समाप्ती' हाच त्यामागचा खरा हेतू असता, तर पहिला बॉंब टाकल्यानंतर तरी जपानला संपूर्ण शरणागती पत्करण्यास थोडा वेळ द्यायला हवा होता; परंतु तसे न करता नऊ ऑगस्ट रोजी अमेरिकेने नागासाकीवर दुसरा अणुबॉंब टाकला! कारण त्यांच्या या नव्या अस्त्राची चाचणी पहिल्या बॉंबमुळे पूर्ण झाली नव्हती!

सकृतदर्शनी जपानवर टाकलेले दोन्ही बॉंब ही अण्वस्त्रेच होती, तरी त्यांच्या घडणीत महत्त्वाचा फरक होता. हिरोशिमावर टाकलेला बॉंब साठ किलोग्रॅम परमोच्च समृद्धीकृत युरेनियम 235 या धातूचा वापर करून बनविला होता, तर नागासाकीवर टाकलेला बॉंब केवळ आठ किलोग्रॅम प्लुटोनियम 239चा वापर करून बनविला होता. तोही तेवढाच प्रभावी ठरत असेल, तर कमी खर्चात प्लुटोनियम वापरून अमेरिकेला आपल्या अण्वस्त्रसाठ्यात झपाट्याने वाढ करणे शक्‍य होणार होते! 

दुसरे उदाहरण : मे 1999मध्ये अमेरिकेने सर्बियामध्ये अशाच एका नव्या अस्त्राची चाचणी घेतली. तो होता "ग्राफाईट बॉंब' किंवा "ब्लॅक ऑउट' बॉंब. या बॉंबमुळे जीवितहानी होत नाही. परंतु, शत्रूची युद्ध करण्याची क्षमताच नष्ट होते. या बॉंबमध्ये ग्राफाईटचे (म्हणजे कार्बनचेच अन्य स्वरूप) अत्यंत बारीक कण ठासून भरलेले असतात. शहरी वस्तीवर हा बॉंब टाकला, की हे कण सर्वत्र पसरतात आणि मुळातच ग्राफाईट उत्कृष्ट विद्युतवाहक असल्यामुळे वीज उत्पादन केंद्रापासून ते शत्रूचे रडार आणि संगणकासारख्या विजेच्या सर्व उपकरणांत शॉर्टसर्किट घडवून ती बंद पडतात.

अशा तऱ्हेने त्या युद्धात अमेरिकेने सर्बियाची सत्तर टक्के वीजनिर्मिती नष्ट केली होती. 
आताच्या प्रमाणे 1991 मधील अफगाणिस्तानच्या युद्धातदेखील (ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म), डोंगरी गुहात लपून संयुक्त राष्ट्रसंघाच्या सैन्यावर अचानक हल्ला चढविणाऱ्या "तालिबानीं'चा बंदोबस्त करण्यासाठी अमेरिकेला एका नव्या शस्त्राची गरज भासली होती. त्या वेळी अमेरिकेने "डेझी कटर' या बॉंबची चाचणी घेतली. त्यात जुन्या आठ इंची तोफांच्या बॅरलमध्ये स्फोटके भरून ती तोराबोरामधील शत्रूच्या लपण्याच्या जागांवर सोडली होती. परंतु, ती फारशी प्रभावी ठरली नाहीत. त्यांचीच जागा आता "मदर ऑफ ऑल बॉंब'ने घेतली आहे. हमीद करझाई यांचे विधान त्याच पार्श्वभूमीवर केलेले दिसते !

पु. ल. पुरोहित 
(निवृत्त एअर व्हाइस मार्शल)