हवाई हल्ल्यात अल् कायदाचा म्होरक्या काहतनी ठार

वृत्तसंस्था
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

अफगाणिस्तानमधील आणखी एक अल् कायदाचा नेता बिलाल-अल-उताबी याच्यावरही हल्ला करण्यात आला आहे. मात्र, अद्याप त्याच्या मृत्यूबाबत ठोस माहिती देण्यात आलेली नाही.

वॉशिंग्टन - गेल्या महिन्यात ईशान्य अफगाणिस्तानमध्ये करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये अल् कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख नेता फारुक अल काहतनी ठार झाल्याचे आज (शनिवार) पेंटागॉनकडून स्पष्ट करण्यात आले.

पेंटागॉनचे प्रवक्ते पीटर कुक यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या सैन्याने गेल्या महिन्यात ईशान्य अफगाणिस्तानमधील कुनार भागात केलेल्या हवाई हल्ल्यात काहतनी ठार झाला. अफगाणिस्तानमध्ये पुन्हा दहशतवादी जाळे पसरविण्याच्या प्रयत्नाला यामुळे मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेच्या सैन्याला पुन्हा एकदा यशस्वी हल्ला करण्यात यश आले. दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्याचे आमचे लक्ष्य आहे. काहतनीचा गेल्या चार वर्षांपासून शोध घेण्यात येत होता. ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर अल् कायदाची सूत्रे जवळपास त्याच्या हाती होती.

अफगाणिस्तानमधील आणखी एक अल् कायदाचा नेता बिलाल-अल-उताबी याच्यावरही हल्ला करण्यात आला आहे. मात्र, अद्याप त्याच्या मृत्यूबाबत ठोस माहिती देण्यात आलेली नाही. कुनारमध्ये अमेरिकेच्या सैन्याकडून दहशतवाद्यांवर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले करण्यात येत आहेत.

Web Title: US Strike Killed Afghanistan Al-Qaeda Leader Farouq al-Qahtani: Official