अमेरिका सरकार 'शट डाउन' 

Donald Trump
Donald Trump

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या सिनेटने सरकारचे अल्पकाळासाठी लागणाऱ्या खर्चाची मागणी करणारे विधेयक नामंजूर केल्याने अमेरिका सरकार आज अधिकृतरित्या ठप्प झाले होते. गेल्या पाच वर्षांतील ही पहिलीच घटना असून डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाला आजच एक वर्ष पूर्ण होत असताना सरकारवर ही नामुष्की आली आहे. 

पेन्टॅगॉन आणि इतर सरकारी संस्थांना दैनंदिन कामकाजासाठी तातडीचा निधी पुरविणाऱ्या विधेयकाला विरोधक असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाबरोबरच सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांनीही विरोध केल्याने स्थानिक वेळेनुसार मध्यरात्री बाराच्या सुमारास सरकारचे कामकाज अधिकृतरीत्या ठप्प (शट डाउन) झाले. सरकारला 16 फेब्रुवारीपर्यंत खर्चासाठी निधी पुरविणारे विधेयक मंजूर होण्यासाठी 60 मते आवश्‍यक असताना सिनेटमध्ये 50-48 या मतांनी विधेयक नामंजूर झाले. विधेयक मंजुरीसाठी सरकारचे अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न सुरू होते. हे विधेयक दुसऱ्या सभागृहात दोन दिवसांपूर्वी मंजूर झाले होते. 

या प्रकाराला विरोधक जबाबदार असून सरकारला एक वर्ष पूर्ण होत असल्यामुळे त्यांनी मुद्दामहून हे घडवून आणल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. 

सरकार आर्थिक संकटात 
कामकाम ठप्प झाल्याचे परिणाम सोमवारपासून (ता. 22) दिसण्याची शक्‍यता आहे. कारण या दिवशी सरकारी कर्मचाऱ्यांना काम करता येणार नाही आणि विनावेतन बळजबरी घरीच बसावे लागणार आहे. जवळपास आठ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना याचा फटका बसणार आहे. केवळ लष्करी आणि इतर अत्यावश्‍यक सेवेत असलेलेच कर्मचारी कामावर असतील. असा प्रकार 2013 ला घडला होता. या वेळी सरकार 16 दिवस ठप्प होते. 

भारताच्या निर्यातीवर परिणाम शक्‍य 
कोलकता : अमेरिका सरकारचे कामकाज ठप्प झाल्याचा परिणाम भारताच्या निर्यातीवरही होणार असल्याचे यांत्रिक वस्तू निर्यात मंडळाने (ईईपीसी) म्हटले आहे. भारतातील वस्तूंचा अमेरिका हा मोठा आयातदार देश आहे. तेथील सरकारच ठप्प झाल्याने हा व्यवहार काही काळ का होईना, बंद पडणार आहे. त्यामुळे भारतातीलही अनेक व्यवहार थंडावणार असून बंदरावरील कामगारांनाही विनावेतन राहावे लागणार आहे.

'शटडाउन' म्हणजे सरकारचा नाकर्तेपणा की हलगर्जीपणा 
अमेरिकेच्या सिनेटने सरकारचे अल्पकाळासाठी लागणाऱ्या खर्चाची मागणी करणारे विधेयक नामंजूर केल्याने अमेरिका सरकार आज अधिकृतरीत्या ठप्प होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाला आजच एक वर्ष पूर्ण होत असताना सरकारवर आलेली ही नामुष्की आहे. 

अमेरिकेत आर्थिक विनियोगावरील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील मतभेदातून "शटडाउन'चे म्हणजेच सरकारचे कामकाज ठप्प होणे, कर्मचाऱ्यांना वेतन तात्पुरते न मिळणे, असे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. जिमी कार्टर अध्यक्ष असताना त्यांच्या काळात दरवर्षी ही समस्या यायची. सरासरी अकरा दिवस त्याचा सामना करावा लागायचा. त्यांच्यानंतर 1980 मध्ये रोनाल्ड रेगन अध्यक्ष झाले. त्यांच्या काळात सहावेळा असे प्रसंग आले. खर्चाच्या नव्या प्रस्तावाला सभागृहाने मान्यता न दिल्याने सरकारचे हात बांधले जातात आणि कामकाज तात्पुरते थांबते, यालाच "शटडाउन' म्हणतात. ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीला वर्ष पूर्ण होत असतानाच सभागृहातील डेमॉक्रॅटना आपली भूमिका पटवून त्यांचे मन वळवण्यात, तसेच स्वपक्षीयांना विश्‍वास देण्यातही ट्रम्प कमी पडले आहेत. 

- बराक ओबामा अध्यक्ष असताना ऑक्‍टोबर 2013 मध्येही त्यांच्या महत्त्वाकांक्षी आरोग्य संरक्षण कायद्यावरून पेच निर्माण झाल्याने "शटडाउन'चा सामना करावा लागला होता. त्याचा साडेआठ लाख कर्मचाऱ्यांना फटका बसला होता, 66 लाख कामाचे तास वाया गेले होते. 
- अमेरिकेत 1976 पासून 18 वेळा "शटडाउन' झाले आहे, असे कॉंग्रेसच्या संशोधन सेवेने म्हटले आहे. तथापि, 1980 नंतर झालेल्या "शटडाउन'चे परिणाम दखल घेण्याजोगे आहेत. आधी झालेल्या "शटडाउन'वेळी विविध खात्यांतील कर्मचारी पैसे कधीतरी मिळतील, अशा विश्‍वासाने कामावर यायचे, काम सुरू राहायचे. 1980-81 मध्ये तत्कालीन ऍटर्नी जनरल बेंजामिन सिवलेटी यांनी, "जोपर्यंत निधी मिळत नाही, तोपर्यंत काम थांबवावे,' असे सुचवले होते. त्यांच्या या मताची कार्यवाही सुरू झाल्यानंतर "शटडाउन'चे परिणामही जाणवू लागले. 
- क्‍लिंटन यांच्या काळात नोव्हेंबर 1995 मधील "शटडाउन' पाच दिवस चालला. 
- डिसेंबर 1995 ते जानेवारी 1996 मधील "शटडाउन' 21 दिवस सुरू होता. बिल क्‍लिंटन अध्यक्ष असताना संतुलित अर्थसंकल्पाच्या मुद्द्यावरून हा "शटडाउन' अनुभवाला आला होता. त्यातील राजकारणानंतर क्‍लिंटन यांनी पुन्हा निवडणूक लढवली आणि जिंकली होती. त्यानंतरची 17 वर्षे "शटडाउन'विरहित गेली. 
- "शटडाउन'काळात सरकारी कामकाजावर विपरीत परिणाम होतो. कर्मचाऱ्यांना तात्पुरते पगारविरहित रजांवर जावे लागते. मात्र, अत्यावश्‍यक सेवा शक्‍यतो कर्मचाऱ्यांना पगार असो अथवा नसो सुरू राहतात. ऑक्‍टोबर 2013 मधील "शटडाउन' दोन आठवडे चालला, त्याने आठ लाख लोकांना तात्पुरत्या बिनपगारी रजा घ्याव्या लागल्या होत्या. 

"शटडाउन'चे परिणाम 
- अमेरिकेच्या अफगाणिस्तान, सिरिया, इराकमधील कारवायांवर याचा काहीही परिणाम झालेला नाही. 
- सध्या शेअरबाजार आणि नियामक यंत्रणेवर काहीही परिणाम झालेला नाही, ती कामे नेहमीप्रमाणे सुरू आहेत. तथापि, आठवड्यावर "शटडाउन' लांबला, तर त्याचे परिणाम होतील, अशी शक्‍यता आहे. कमोडिटी फ्युचर ट्रेडिंग कमिशनने मात्र आपल्या 95 टक्के कर्मचाऱ्यांचे कामकाज तात्पुरते थांबवले आहे. 
- "शटडाउन'काळातही आपले कार्य सुरळीत ठेवण्यासाठीची योजना न्याय खात्याने तयार केली आहे. 
- अमेरिकेतील नॅशनल पार्क विशेषतः पर्यटक भेटी देत असलेल्या वास्तू, संग्रहालये यांचे कार्य गेल्यावेळी थांबवले गेले होते, त्याने महसुलावर परिणाम झाला होता. या वेळी अद्याप त्या दिशेने पावले उचलली गेली नाहीत. 
- 2013 मध्ये महसूल खात्यातील 90 टक्के कर्मचाऱ्यांचे काम तात्पुरते थांबवल्याने अब्जावधी डॉलरच्या परताव्याच्या प्रक्रियेला विलंब लागला होता. टपालाचा बटवडा, न्यायालयाचे कामकाज, आरोग्य सुविधा, वाहतूक अशा महत्त्वाच्या घटकांवर या निर्णयाचा परिणाम तातडीने होत नसला तरी "शटडाउन' लांबल्यानंतर सेवांमध्ये विस्कळितपणा येऊन त्याचे परिणाम जनतेला भोगावे लागतात, हा इतिहास आहे. या वेळी त्याची तीव्रता किती जाणवेल, हे पाहावे लागेल. 
- अभय सुपेकर, (सकाळ संशोधन आणि विकास विभाग) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com