ट्रम्प यांच्याकडून भारताची स्तुती अन्‌ चीनला टोला

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

"अपेक' परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधान मोदींचे कौतुक

दानंग (व्हिएतनाम) : जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला भारत अत्यंत वेगाने प्रगती करत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अत्यंत यशस्वीपणे जनतेला एकत्र आणत आहेत, अशी स्तुतिसुमने उधळत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे कौतुक केले आहे. याचवेळी चीनवर मात्र त्यांनी तिरकस टिप्पणी केली आहे.

चीनचा दौरा आटोपून डोनाल्ड ट्रम्प हे आज आशिया-प्रशांत आर्थिक सहकार्य परिषदेसाठी (अपेक) व्हिएतनाम येथे दाखल झाले. चीनच्या मदतीने जगातील सर्व प्रश्‍न सोडविण्याचा विश्‍वास काल (ता. 9) व्यक्त केल्यानंतर ट्रम्प यांनी आज अत्यंत अनपेक्षितपणे भारताचे गुणगान केले. "अपेक'मध्ये बोलताना ट्रम्प यांनी भारताच्या वेगाने होणाऱ्या प्रगतीची ठळकपणे दखल घेतली. ""भारताने स्वातंत्र्याच्या 70 व्या वर्षांत पदार्पण केले आहे. एक अब्जाहून अधिक जनतेची ती सार्वभौम लोकशाही आहे. भारताची अर्थव्यवस्था खुली झाल्यापासून हा देश अत्यंत वेगाने प्रगती करत आहे. या विकासामुळे सर्व भारतीयांना संधीचे नवे जग खुले झाले आहे. या देशातील जनतेला एकत्र आणण्यात पंतप्रधान मोदी अत्यंत यशस्वी ठरत आहेत,'' असे ट्रम्प म्हणाले.
चीन दौऱ्यावर असताना अमेरिका आणि चीनमधील असमतोल व्यापाराचा ओझरता उल्लेख केलेल्या ट्रम्प यांनी आज या विषयावर थेट टिप्पणी केली. चीनबरोबर व्यापारात असमतोल असल्याने केवळ चीनला फायदा होत असून, अमेरिकी नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. यापुढे मात्र अमेरिका डोळे बंद ठेवून अशी चुकीची पद्धत चालू देणार नाही, असे ट्रम्प यांनी चीनला बजावले. "अपेक' परिषदेमध्ये अमेरिकेबरोबरच जपान, रशिया, चीन आणि दक्षिण कोरिया हे देश सहभागी झाले आहेत.

ट्रम्प-पुतीन भेट नाही
"अपेक'च्या निमित्ताने डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांची भेट होण्याची शक्‍यता व्यक्त होत असताना अमेरिकेने यावर नकारार्थी उत्तर दिले आहे. अमेरिकेच्या निवडणुकीत रशियाने हस्तक्षेप केल्याचा आरोप होत असल्याने दोन्ही देशांमध्ये सध्या संशयाचे वातावरण आहे. रशियाने दोन दिवसांपूर्वी निवेदन प्रसिद्ध करताना ट्रम्प आणि पुतीन यांची व्हिएतनाममध्ये भेट होण्याची शक्‍यता व्यक्त केली होती.