हिलरींचा सूड घेण्यासाठी पुतीननी घडविले "हॅकिंग'?

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

क्‍लिंटन या अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री असताना (2011) त्यांनी रशियात झालेल्या संसदीय निवडणुकीच्या विश्‍वासार्हतेबद्दल शंका उपस्थित केली होती. यामुळे संतप्त झालेल्या पुतीन यांनी त्यांना माफ केले नसल्याचे मानले जात आहे...

वॉशिंग्टन - अमेरिकेमध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत घडविण्यात आलेल्या "हॅकिंग'मध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे व्यक्तिश: सहभागी होते, असे अमेरिकेच्या गुप्तचर खात्यामधील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री व डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षीय उमेदवार हिलरी क्‍लिंटन यांच्याविरोधात सूड घेण्यासाठी पुतीन यांनी निवडणुकीमध्ये हस्तक्षेप केल्याचे या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

याआधी, "दी वॉशिंग्टन पोस्ट' या अमेरिकेमधील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रानेही रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना विजय मिळवून देण्यासाठी रशियाने अमेरिकेमधील महत्त्वपूर्ण संस्था व व्यक्‍तींचे इमेल्स हॅक केल्याचे म्हटले होते. या वृत्तास अमेरिकेच्या गुप्तचर खात्यामधील अधिकाऱ्यांनीही आता दुजोरा दिला आहे.

क्‍लिंटन या अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री असताना (2011) त्यांनी रशियात झालेल्या संसदीय निवडणुकीच्या विश्‍वासार्हतेबद्दल शंका उपस्थित केली होती. यामुळे संतप्त झालेल्या पुतीन यांनी त्यांना माफ केले नसल्याचे मानले जात आहे.

हिलरी यांच्याविरोधातील सूडाने पुतीन यांच्या या हॅकिंग मोहिमेची सुरुवात झाली असली; तरी अमेरिकेच्या जागतिक नेतृत्वाबद्दल गंभीर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणे, हा त्यांचा मुख्य उद्देश असल्याचे या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. अमेरिका आता विश्‍वासार्ह जागतिक नेतृत्व राहिले नसल्याची प्रतिमा निर्माण करुन अमेरिकेच्या मित्र देशांमध्ये फूट पाडणे, हे या हॅकिंग मोहिमेचे राजनैतिक ध्येय असल्याचे मत या अधिकाऱ्यांकडून व्यक्‍त करण्यात आले आहे.

दरम्यान, अमेरिकेचे होणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा आरोप हास्यास्पद असल्याची टीका केली आहे. मात्र या आरोपांची आता उच्चस्तरीय औपचारिक चौकशी व्हावी, अशी मागणी अमेरिकेमधील काही लोकप्रतिनिधींनी केली आहे.