अमेरिकेमध्ये आज मतदान 

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या इतिहासात आजपर्यंत सर्वाधिक चुरशीची ठरण्याची शक्‍यता असलेल्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी आज (ता. ८) मतदान होणार आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्‍लिंटन (वय ६९) आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प (वय ७०) यांच्यात अध्यक्षपदासाठी खरी चुरस आहे. दहशतवादी हल्ल्याचा इशारा मिळाल्याने अमेरिकेचे ४५ वे अध्यक्ष निवडण्यासाठीच्या या प्रक्रियेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. 

डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षातील सर्वाधिक वादग्रस्त नेते असले आणि पक्षातील नेत्यांचा त्यांना पाठिंबा कमी असला तरी नागरिकांमधून त्यांना जोरदार प्रतिसाद मिळत आहे. ते निवडून आल्यास अध्यक्ष म्हणून निवड झालेले ते सर्वांत वयस्क व्यक्ती असतील. सुरवातीपासूनच आघाडीवर असलेल्या हिलरी क्‍लिंटन या निवडून आल्यास त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरतील; तसेच माजी अध्यक्ष असलेल्या व्यक्तीच्या जोडीदारानेही हे पद मिळविण्याची ही पहिलीच घटना असेल. हिलरी यांचे पती बिल क्‍लिंटन यांनीही देशाचे अध्यक्षपद भूषविले आहे. मुस्लिमविरोधी वक्तव्ये आणि लैंगिक अत्याचारांचे आरोप यामुळे टीकेचे धनी बनलेल्या ट्रम्प यांनी प्रचारादरम्यान अमेरिकेला अधिक शक्तिशाली करण्याचे आणि खरी ओळख मिळवून देण्याचे आश्‍वासन नागरिकांना दिले आहे. हिलरी यांनाही ई-मेल गैरव्यवहार प्रकरणाच्या आरोपांना सामोरे जावे लागले. जागतिक शांततेसाठी ट्रम्प यांना नाकारण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे. 

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या इतिहासात ही आतापर्यंतची सर्वाधिक चुरशीची आणि आरोपांनी गाजलेली निवडणूक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. क्‍लिंटन यांची लोकप्रियता घटली असली तरी नव्या सर्वेक्षणानुसार, अद्यापही त्या ट्रम्प यांच्यापेक्षा चार टक्के मतांनी आघाडीवर असल्याने त्यांच्याच विजयाची शक्‍यता अधिक आहे.

Web Title: Voting in the US today