चीनच्या दृष्टीने भारत हा दीर्घकालीन आव्हान

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

चीनच्या नजरेतून भारत ही सर्वांत मोठी विकसनशील शक्ती असून आगामी काळात चीनसाठी आव्हान निर्माण करणारी आहे. आशियामधील चीनचा प्रभाव कमी करण्यासाठी भारत अत्यंत वेगाने जपान, अमेरिका, ऑस्ट्रेलियासारख्या देशांशी सहकार्य वाढवत असल्यानेही चीन चिंतेत आहे.
- बोनी एस. ग्लासर

मोदींच्या ठाम भूमिकांमुळे जिनपिंग चिंतेत असल्याचा अमेरिकी तज्ज्ञांचा दावा

वॉशिंग्टन: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीयांच्या हितासाठी झगडणारे आणि चीनवर दबाव टाकू इच्छिणाऱ्या देशांबरोबर काम करण्यास तयार असलेले नेते असल्याचे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना वाटत असल्याचा दावा अमेरिकेतील तज्ज्ञांनी केला आहे. जिनपिंग यांच्या दृष्टीने मोदी हे जागतिक स्तरावरील आव्हानात्मक नेते असल्याचेही या तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

"चीनला दोन हात दूर ठेवणाऱ्या आणि प्रसंगी त्यांच्यासमोर आव्हान निर्माण करणाऱ्या अमेरिका आणि जपानसारख्या देशांबरोबर काम करण्यास पंतप्रधान मोदी हे कायम उत्सुक असतात. यामुळे चीनला काळजी वाटत आहे,' असे अमेरिकेतील सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीज्‌मधील (सीएसआयएस) अभ्यासक बोनी एस. ग्लासर यांचे म्हणणे आहे. ग्लासर या आशियातील घडामोडींच्या तज्ज्ञ असून अमेरिकेचा "थिंक टॅंक' असलेल्या "सीएसआयएस'मधील चीनविषयक विभागाच्या संचालिका आहेत. मोदींना भेटण्यासाठी जिनपिंग भारतात आले, त्या वेळी भारताची धोरणे चीनला आव्हानात्मक नसतील यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. मात्र, दक्षिण चिनी समुद्रातील वादामुळे त्यांच्या या प्रयत्नांना भारताने बगल दिली, असे ग्लासर यांनी सांगितले. "हिंदी महासागरासह इतर क्षेत्रांमध्ये भारत आणि चीनमध्ये वाद आहेत. दोन्ही देशांच्या सीमा एकमेकांना लागून असल्याने भारताबरोबर तणावपूर्ण संबंध ठेवल्यास फारसा फायदा होत नाही, याची चीनला जाणीव आहे,' असा दावाही त्यांनी केला आहे. चीनच्या "वन बेल्ट, वन रोड' प्रकल्पाला विरोध करणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे.

लष्करी नव्हे, राजकीय भीती
भारताबरोबर विविध मुद्‌द्‌यांवर वाद असून, भारताच्या लष्कराची चीनला भीती वाटत नाही. चीनचे लष्कर भारताहूनही मोठे आहे. भारताकडील अण्वस्त्रांबाबतही चीनला काळजी नाही. मात्र, जागतिक स्तरावर भारताची राजकीय ताकद वाढत असल्याबाबत चीनला काळजी आहे. भारत अनेक देशांना मित्र बनवत असल्याने चीनची कोंडी होत आहे.

डोकलामवरही लक्ष
ग्लासर या डोकलाम वादावरही लक्ष ठेवून आहेत. चीनच्या दबावाखाली येऊन भारताने डोकलाममधून सैन्य मागे घेतले तर, चीन तेथे रस्ता पूर्ण करणारच. त्यामुळे भारत आणि भूतानला इच्छा नसतानाही तो चीनचा भाग असल्याचे मान्य करावे लागेल. याचा फायदा चीन इतर देशांबरोबरील प्रादेशिक वादांमध्ये करून घेऊ शकतो. त्यामुळे भारताने भूमिकेवर ठाम राहणे आवश्‍यक असल्याचे ग्लासर यांचे मत आहे.