सर्जिकल स्ट्राइकबाबत पाकचा भारताला इशारा

वृत्तसंस्था
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

वॉशिंग्टन : लक्ष्यवेधी हल्ले (सर्जिकल स्ट्राइक) करण्याच्या अथवा पाकिस्तानच्या अणू केंद्रांवर हल्ले करण्याच्या भारताच्या तयारीबाबत पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भारताने ही आगळीक केल्यास पाकिस्तान शांत बसणार नाही, असा इशाराही आसिफ यांनी दिला आहे.

वॉशिंग्टनमधील "इन्स्टिट्यूट ऑफ पीस' या संस्थेमध्ये आसिफ यांचे आज भाषण होते. या वेळी त्यांनी भारताचे हवाई दलप्रमुख बी. एस. धनोआ यांनी काल (ता. 5) भारताच्या युद्धसज्जतेबाबत विधान केले होते. भारत दोन्ही आघाड्यांवर लढण्यास सज्ज असून, लक्ष्यवेधी हल्ले आणि अणुकेंद्र शोधून नष्ट करण्याची क्षमता असल्याचे ते म्हणाले होते. हा संदर्भ घेत ख्वाजा आसिफ म्हणाले की, पाकिस्तानला आपल्या शेजाऱ्यांबरोबर शांतता हवी आहे. मात्र, भारताने हल्ला केल्यास आम्ही शांत बसू, अशी अपेक्षा कोणीही करू नये. भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सध्या सर्वाधिक तणावाचे आहेत. काश्‍मीरमधील परिस्थिती निवळण्यासाठी चर्चा हाच एकमेव मार्ग आहे. मात्र, आमच्या प्रयत्नांना भारताचा प्रतिसाद मिळत नाही.

पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देत असल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आरोप केल्यानंतर अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध बिघडले आहेत. अमेरिकेचा राग शांत करण्याचा प्रयत्न म्हणून आसिफ येथे आले आहेत. त्यांनी येथे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्‍स टिलरसन आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एच. आर. मॅकमास्टर यांची भेट घेतली. या दोघांबरोबर सकारात्मक चर्चा झाल्याचा दावाही त्यांनी केला. मदरशांमध्ये जिहादचे प्रशिक्षण दिले जात असून, यामुळे अफगाणिस्तानातील परिस्थिती बिघडली असल्याचे आसिफ यांनी या वेळी कबूल केले.