ट्रम्प यांच्या प्रवासबंदीवर सुप्रीम कोर्टाची मोहर

वृत्तसंस्था
मंगळवार, 5 डिसेंबर 2017

अमेरिकेच्या सुरक्षेच्या कारणास्तव अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रवासबंदीचा निर्णय घेतला असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयाचे आम्हाला विशेष आश्‍चर्य नाही.
- होगन गिड्‌ली, व्हाइट हाउस प्रवक्ता

वॉशिंग्टन: सहा मुस्लिमबहुल देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याच्या निर्णयाला आज येथील सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली असून, हा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय मानला जात आहे.

ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर जानेवारीत लागलीच सुरक्षेचे कारण पुढे करत हा निर्णय घेतला होता. आज सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी झालेल्या सुनावणीत एकूण नऊ न्यायाधीशांपैकी सात जणांनी या निर्णयाच्या बाजूने कौल देत याविषयी कनिष्ठ न्यायालयांनी घातलेले प्रतिबंध हटविले; तर अन्य दोन न्यायाधीशांनी सरकारची मागणी मान्य करण्यास स्पष्टपणे नकार दर्शविला.

या निर्णयाविरोधात कनिष्ठ न्यायालयात अद्याप सुनावणी प्रलंबित असली तरी, सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या मंजुरीमुळे सरकारला आपल्या प्रवासबंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे शक्‍य होणार आहे. त्यामुळे सरकारच्या पूर्वपरवानगीशिवाय इराण, लीबिया, सीरिया, येमेन, सोमालिया आणि चाड या सहा देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोणतेही कारण न देता मंजुरी
सर्वोच्च न्यायालयाने या प्रवेशबंदीवर शिक्कामोर्तब करताना त्यासाठी कोणतेही कारण दिलेले नाही. याप्रकरणी सुनावणी करणाऱ्या कनिष्ठ न्यायालयांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची पडताळणी करावी, जेणेकरून सुनावणीची प्रक्रिया जलद गतीने होईल, अशी अपेक्षा सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली.

Web Title: washington news Supreme Court stamp on Trump's stay