भारताच्या यशाकडे पाहत बसावे लागेल

पीटीआय
शुक्रवार, 12 मे 2017

चीन सरकारला तज्ज्ञांचा इशारा; भारताचा अभ्यास करण्याचा सल्ला

बीजिंग : भारतीय अर्थव्यवस्था आगामी काळात प्रचंड वेगाने वाढण्याची शक्‍यता असल्याने चीनने ही स्पर्धा पुरेशा गांभीर्याने घ्यावी, असा सल्ला चीनमधील तज्ज्ञांच्या गटाने तेथील सरकारला दिला आहे. चीनने पुरेसे लक्ष न दिल्यास भारताच्या यशाकडे केवळ पाहत बसावे लागेल, असा इशाराही या तज्ज्ञांनी दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत वेगाने विकास करत असून, गुंतवणुकीला आकर्षित करून घेण्यात भारताचा आत्मविश्‍वास दिसून येत आहे. तसेच, स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढविण्याच्या मोदी यांच्या धोरणाचाही सकारात्मक परिणाम गुंतवणूकदारांवर होत असल्याचे या तज्ज्ञांच्या गटाने दिलेल्या अहवालात म्हटले आहे. "सध्या जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनने विकासाचे पर्यायी धोरणही तयार करणे आवश्‍यक आहे. चीनमधील युवकांचे प्रमाण कमी होत असताना भारतातील तरुणवर्ग मात्र नवी आव्हाने अंगावर घेण्यास सज्ज आहे. त्यामुळे चीनने आतापासूनच लक्ष न दिल्यास भारताच्या यशाचा एक साक्षीदार म्हणून चीनचे स्थान राहील,' असे या अहवालात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. भारताच्या अर्थव्यवस्था वाढीचा वेग वाढत असताना चीनचा वेग कमी होत असल्याकडेही या अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे.

"जागतिक बॅंकेकडून कर्ज मिळवून आगामी पाच वर्षांमध्ये विविध सौर ऊर्जा प्रकल्पांमध्ये जवळपास शंभर अब्ज डॉलरची गुंतवणूक होण्याची भारताला अपेक्षा आहे. याबाबतीत जगातील कोणताच देश सध्या भारताशी स्पर्धा करू शकत नाही. चीनने भारताच्या या धोरणांचा अद्यापही नीट अभ्यास केलेला नाही. चीनमधीलही अनेक कंपन्या भारतात गुंतवणूक करत आहेत. जागतिक गुंतवणूकदारांसमोर भारताने योग्य स्पर्धात्मक वातावरण निर्माण केल्यास ते चीनसमोर मोठे आव्हान असेल,' असेही अहवालात म्हटले आहे.