महिलांच्या कर्तृत्वासाठी वातावरण तयार करू- ट्रम्प

वृत्तसंस्था
शुक्रवार, 31 मार्च 2017

अमेरिकेच्या शांतता मोहिमांबाबत फेरविचार करून या मोहिमांचा अधिक सकारात्मक वापर करण्याचा आपण प्रयत्न करू.
- निकी हॅले, राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या नियोजित राजदूत

वॉशिंग्टन: अमेरिकेतील महिला मुक्तपणे काम करून कधी मिळविले नव्हते इतके देदीप्यमान यश मिळवू शकतील, यासाठी प्रशासन पूर्ण प्रयत्न करेल, असे आश्‍वासन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज दिले. महिला सबलीकरणाबाबत आज झालेल्या चर्चेवेळी ट्रम्प यांनी निकी हॅले आणि सीमा वर्मा या भारतीय वंशाच्या अधिकाऱ्यांच्या कामाचेही कौतुक केले.

निकी हॅले या आपली जबाबदारी फारच उत्कृष्टपणे पार पाडत आहेत, असे ट्रम्प यांनी या बैठकीवेळी सांगितले. हॅले या पुढील महिन्यात अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रसंघातील राजदूत म्हणून सूत्रे स्वीकारणार आहेत. या बैठकीवेळी आरोग्य विभागातील प्रमुख अधिकारी सीमा वर्मा आणि ट्रम्प यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प या उपस्थित होत्या. ट्रम्प म्हणाले, ""माझ्या मंत्रिमंडळात प्रचंड क्षमतेच्या महिला नेत्या आहेत. महिलांना पूर्वीपेक्षाही अधिक मोकळेपणे काम करून मोठे यश मिळविता यावे, यासाठी माझे प्रशासन जोरदार प्रयत्न करेल. आपल्या देशात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीचा स्वत:वर, स्वत:च्या भविष्यावर आणि स्वप्नांवर पूर्ण विश्‍वास बसेल, असे वातावरण आपण निर्माण करू.''

परिस्थितीमुळे आईवर अन्याय : हॅले
महिलांच्या विकासाला प्राधान्य देणाऱ्या लोकशाहीचा नेहमीच विकास होतो, असे दक्षिण कॅरोलिनाच्या गव्हर्नर निकी हॅले यांनी आज सांगितले. यासंदर्भात उदाहरण देताना त्यांनी स्वत:च्या आईवर भारतातील तत्कालीन परिस्थितीमुळे अन्याय झाल्याचे त्यांनी सांगितले. "भारतात महिला फारसे शिक्षण घेत नसताना माझी आई न्यायाधीश झाली होती. देशातील काही पहिल्या महिला न्यायाधीशांपैकी ती एक होती. मात्र, केवळ एक महिला होती म्हणून तिला इतरांबरोबर बेंचवर बसू दिले जात नव्हते,' अशी आठवण हॅले यांनी सांगितली.

Web Title: Women's ability to create an environment- Trump