Ganesh Festival : पौराणिक व ऐतिहासिक देखाव्यांतून जपली धार्मिक परंपरा

पुणे - झोपाळ्यावर विराजमान झालेली शारदा-गजाननाची मूर्ती, समाजप्रबोधनातून साकारलेला ‘आम्ही सारे भारतीय’ हा देखावा, तिरुपती बालाजीचे फायबरचे मंदिर, गजराजांतर्फे ‘श्रीं’ची आरती, हत्ती महालात विराजमान झालेले ‘श्रीं’ आणि ‘झाडे जगवा, झाडे वाचवा’चा संदेश देत शुक्रवार पेठेतील गणेश मंडळांनी वैविध्यपूर्ण देखावे साकारले आहेत.
 अखिल मंडई मंडळाचे यंदा १२५ वे वर्ष आहे. या निमित्ताने मंडळाने काल्पनिक गणेश महाल साकारला आहे. तर सेवा मित्र मंडळाने जात, धर्म, पंथ भेद विसरून आपण सारे भारतीय हा प्रबोधनपर जिवंत देखावा सादर केला. राजर्षी शाहू चौक मित्र मंडळाने फायबरचे भव्य बालाजी मंदिर उभारले आहे. मंदिरातील ‘श्रीं’ची भव्य मूर्तीही भाविकांचे लक्ष वेधून घेते. लाकडी गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ‘श्रीं’ची आरती करतानाचा हलता देखावा केला आहे. वस्ताद शेखचंद नाईक तालीम मंडळाचेही यंदा १२५ वे वर्ष आहे. या मंडळाने हत्तीमहल केला आहे. महालात विराजमान झालेली ‘श्रीं’ची मूर्ती विलोभनीय दिसत आहे. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने या मंडळातर्फे मोफत लग्न लावून देण्याचा उपक्रम वर्षभर राबविण्यात येतो. 

अकरा मारुती कोपरा मित्र मंडळाने यंदा रावण वधाचा हलता देखावा केला आहे. मंडळाने पौराणिक देखावे सादर करण्याची परंपरा यंदाही कायम राखली आहे. उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात या मंडळाचा विशेष प्रयत्न असल्याची माहिती अध्यक्ष राजेंद्र देशमुख यांनी दिली. 

अकरा मारुती चौक मित्र मंडळाने यंदाही पारंपरिक मात्र धार्मिक पद्धतीने उत्सवास सुरवात झाली. दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या ‘श्रीं’च्या पहिल्या मूर्तीचे दर्शन येथे भाविकांना घडते. चिंचेची तालीम मंडळाने विद्युत रोषणाईचा देखावा यंदाही साकारला आहे. 

आवर्जून पाहावेत असे देखावे...
 अखिल मंडई मंडळ 
 वस्ताद शेखचंद नाईक तालीम मंडळ 
 राजर्षी शाहूचौक मित्र मंडळ
 लाकडी गणपती मंडळ 
 अकरा मारुती कोपरा मित्र मंडळ 
 अकरा मारुती चौक मित्र मंडळ
 सेवा मित्र मंडळ

ऐतिहासिक परंपरा कायम 
पौराणिक, धार्मिक, सामाजिक, ऐतिहासिक देखाव्यांसह विद्युत रोषणाईचे देखावे सादर करण्याची परंपरा सदाशिव पेठेतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदाही जपली आहे. लोकमान्य टिळक प्रथम प्रस्थापित गणपती ट्रस्ट (सरदार विंचूरकर वाडा) येथे साध्या पद्धतीने ‘श्रीं’चा उत्सव साजरा होतो. लोकमान्य टिळकांनी या वाड्यातूनच सार्वजनिक गणेशोत्सवास सुरवात केली. पगडी परिधान केलेल्या ‘श्रीं’च्या मूर्तीचे दर्शन येथे घडते. छत्रपती राजाराम मंडळाने साकारलेले तमिळनाडूतील वेल्लूरचे सुवर्ण मंदिर विशेष आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. मंदिराची प्रतिकृती ७२ फूट लांब, ३४  फूट रुंद आणि ६० फूट उंच आहे. मंदिरात आकर्षक झुंबरे व रंगीबेरंगी दिव्यांची रोषणाई केली आहे. नागनाथपार मित्र मंडळाने जुन्या महाबळेश्‍वरमधील हजारो वर्षांपूर्वीचे शिवलिंग असलेल्या महाबळेश्‍वर मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. शनिपार मित्र मंडळाने सत्यम-शिवम-सुंदरम हा कागदाच्या लगद्यापासून भव्य देखावा केला आहे. निंबाळकर तालीम मंडळाचा कर्तव्यदक्ष किल्लेदार हा देखावा आहे. खजिना विहीर तरुण मंडळाने नागपंचमीचा महिला-मुलींच्या खेळाचा हलता देखावा केला आहे. बाजीराव रस्ता नातूबाग मंडळ, चिमण्या गणपती मंडळ, वंदेमातरम्‌ मंडळ, दिग्विजय मंडळांनी विद्युत रोषणाई केली आहे. 

आवर्जून पाहावेत असे देखावे...
 छत्रपती राजाराम मंडळ 
 निंबाळकर तालीम मंडळ 
 खजिना विहीर तरुण मंडळ
 नागनाथपार मंडळ

संगीताच्या तालावर रोषणाई 
बाजीराव रस्ता नातूबाग मंडळाने यंदा लेड पिक्‍सेल बल्बचा वापर केला आहे. यामधून सप्तरंग प्रकाशित होतात. संगीताच्या तालावर विद्युत रोषणाई करणारे हे मंडळ आहे. शिवशक्ती इलेक्‍ट्रिकल डेकोरेटर्सचे शंकर धारफळे यांनी ही विद्युत रोषणाई केली आहे. गेल्या काही वर्षांपासून मंडळ खड्डेविरहित मंडप उभारते, अशी माहिती अध्यक्ष प्रमोद कोंढरे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com