ढोल-ताशा महोत्सवात "तालरुद्र' प्रथम 

रामनगरी द्वितीय, जल्लोषला तृतीय पारितोषिक 

नाशिक : "सकाळ', पार्कसाइड होम्स व शिवसाम्राज्य ढोलपथक यांच्यातर्फे आज मुंबई-आग्रा महामार्गावरील पार्कसाइड होम्सच्या मैदानावर झालेल्या ढोल-ताशा महोत्सवात तालरुद्र पथकाने प्रथम क्रमांक पटकावला, तर रामनगरी पथकाने दुसरा, तर जल्लोष ग्रुपने तिसरा क्रमांक पटकावला. दिवसभर सुरू असलेल्या ढोल-ताशांच्या जुगलबंदीचा आनंद घेत ढोलपथकांच्या रसपूर्ण अदाकारीस नाशिककरांनी भरभरून दाद दिली. 


ढोल-ताशाबद्दल तरुणाईच्या आकर्षणाला कलात्मक आणि स्पर्धात्मक रूप देण्याच्या उद्देशाने "सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीतर्फे महोत्सव झाला. महोत्सवात जिल्ह्यासह राज्यातील 14 ढोलपथके सहभागी झाली. नगरसेवक उद्धव निमसे, नातू केटरर्स, अमर साउंड, रेडिओ मिर्ची, सोनवणे बंधू आणि साम टीव्ही आदी सहप्रायोजक असलेल्या या महोत्सवाबद्दल ढोलप्रेमींमध्ये मोठे औत्सुक्‍य होते. त्यामुळे पार्कसाइडच्या मैदानावर विविध पथकांसह ढोलप्रेमींनी सकाळपासूनच गर्दी केली. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. व "सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने यांच्या ढोलवादनानंतर स्पर्धेस सुरवात झाली.

त्यानंतर विविध ढोलपथकांनी अदाकारी सादर करीत प्रत्यक्ष शिवशाही अवतरल्याचा आभास निर्माण केला. 
बक्षीस वितरण समारंभास महापौर अशोक मुर्तडक, आमदार डॉ. सुधीर तांबे, संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे, पार्कसाइड होम्सचे संचालक गोपाल अटल, उमेश बागूल, दिलीप फडोळ, मुक्त विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संतोष साबळे, वैभव नातू आदी उपस्थित होते. महोत्सवास राज्य ढोल-ताशापथक महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर प्रमुख पाहुणे होते. सौरभ गुजर, सुनील गोडसे व राजन घाणेकर परीक्षक होते. दुसऱ्या फेरीनंतर खऱ्या अर्थाने महोत्सवाची रंगत वाढत गेली. महोत्सवातील तरुणींचा सहभागही लक्षणीय होता. 


तालरुद्र ढोलपथकास प्रथम क्रमांकाच्या बक्षिसाचे रोख 21 हजार रुपये व सन्मानचिन्हाने गौरविण्यात आले. रामनगरी ढोलपथकाने दहा हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक आणि जल्लोष ढोलपथकाने सात हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक पटकावले. याशिवाय शिवशाही, वीरभद्र व वरदविनायक ढोलपथकांना प्रत्येकी एक हजार रुपयांच्या पारितोषिकाने गौरविण्यात आले. स्पर्धा आयोजनासाठी "सकाळ'चे युनिट व्यवस्थापक राजेश पाटील, वरिष्ठ वितरण व्यवस्थापक राजेंद्र महाजन, जाहिरात व्यवस्थापक सुनील पाटील, व्यवस्थापक (इव्हेंट) अशोक चव्हाणके, शिवसाम्राज्य पथकाचे कुणाल राजेभोसले, सागर चौधरी आणि महेंद्र नागपुरे, शरद धात्रक आदी प्रयत्नशील होते. 

(सोमनाथ कोकरे : सकाळ छायचित्रसेवा) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com