सर्जा-राजाला पुरणपोळीचा घास

जाफराबाद - तालुक्‍यात सर्वत्र पोळयाचा उत्साह दिसून आला. बैलांना स्नान घालून झूल चढवून मिरवणुकीत सहभागी करण्यात आले होते. या प्रसंगी सुवासिनी शालिनी दिवटे, प्राचार्य निवृत्ती दिवटे यांनी मानाच्या बैलाची पूजा करून नैवेद्य दिला. शहाडा वाजल्यानंतर आंब्याच्या तोरणाखालून घरोघरच्या पुरणपोळीचा नैवेद्य घेण्यासाठी बैलांना नेण्यात आले. घरोघरच्या सुवासिनींनी बैल आणि बळिराजाचे औक्षण करून बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला. जाफराबाद शहरातील अहल्यादेवी होळकरनगर, परदेशीपुरा, संतोषीमाता मंदिर, मालेगाव गल्ली या ठिकाणी पोळा भरला. या वेळी मंडळ अधिकारी बी. डी. भावले, धनश्री पतसस्थेचे चेअरमन सुरेश दिवटे, दामुअण्णा वैद्य, नगरपंचायत सभापती प्रकाश दिवटे, माधवराव सोरमारे, श्‍याम वैदय, माजी उपसरपंच श्रीरंग दिवटे, कैलास दिवटे, मिलिंद सोनुने, धोंडू दिवटे, संदीप जाधव, दीपक हिवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

गेल्या अनेक वर्षांपासून पोळ्याच्या दिवशी बैलांना बैलगाडीचे ‘जू’ दिसू नये म्हणून ‘जू’ झाकून ठेवण्याची परंपरा आहे. ती आजही कायम आहे. 
- नामदेव मामा वैद्य

बदनापूर - शहरासह तालुक्‍यात सोमवारी (ता. २१) पोळ्याचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. गावागावांत बैलांना सजवून त्यांची मारुती मंदिरापासून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली; तसेच घरोघरी बैलांचे पूजन करून त्यांना पुरणपोळीचा घास भरविण्यात आला. दरम्यान, दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर पोळा सणावर येऊ घातलेले निराशेचे सावट पावसाच्या पुनरागमनाने जाणवले नाही. 

बदनापूर तालुक्‍यात खरीप पेरण्या आटोपताच पावसाने पाठ फिरविल्याने खरीप पिकांची वाताहत झाल्याचे चित्र उभे राहिले आहे. या परिस्थितीचे परिणाम बैलपोळा सण साजरा करताना दिसेल अशी शक्‍यता वाटत होती; मात्र दोन दिवसांपासून पावसाचे दमदार पुनरागमन झाल्याने वर्षभर राबणाऱ्या बैलांचा सण साजरा करताना बळिराजाने कुठलीही काटकसर केली नाही. पोळा सणानिमित्त दोन दिवसांपासून बळिराजाच्या घरात उत्साहाचे वातावरण होते. यंदा बहुतांश ठिकाणी ओढे-नाले कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोमवारी पाणीसाठा असलेल्या ओढ्यांवर, विहिरींवर, तर काही शेतकऱ्यांनी वॉशिंग सेंटरवर बैलांना स्नान घातले. 

पोळ्याच्या पूर्वसंध्येला खांदेमळणीचा कार्यक्रम झाला. सोमवारी बैलांना साजशृंगार घालून त्यांना मिरवणुकीसाठी तयार केले. ग्रामीण भागात दुपारपासूनच मारुती मंदिरात नेऊन बैलपोळ्याची मिरवणूक काढण्यात आली. यानंतर घरोघरी महिलांनी बैलांचे औक्षण करून त्यांना पुरणपोळीचा घास भरविला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com