जळगाव जिल्ह्यातील ९९ टक्के जिनिंग, प्रेसिंग मिल्स बंद

कापूस नसल्याचा परिणाम; १५ लाखांऐवजी आठ लाख गाठींचीच निर्मिती
99 percent cotton ginning pressing mills closed in Jalgaon
99 percent cotton ginning pressing mills closed in Jalgaon sakal

जळगाव: बाजारात कापूसच येत नसल्याचे ९९ टक्के जिनिंग, प्रेसिंग मिल बंद झाल्या आहेत. केवळ बोटावर मोजण्या एवढ्याच तीन-चार मिल्स सध्या सुरू आहेत. दर वर्षी जिल्ह्यातून पंधरा लाख कपाशीच्या गाठी जिनिंग, प्रेसिंगमध्ये तयार होऊन निर्यात होत असत. यंदा कापूसच नसल्याने आतापर्यंत केवळ आठ लाख गाठींची निर्मिती झाली आहे. यंदा पावसाळा चांगला होता. कापूस हंगामही चांगला होता. मात्र तीन-चार वेळा झालेल्या अतिवृष्टीने कापूस उत्पादनात घट आली.

या घटीमुळे कपाशीला कधी नव्हे एवढा नऊ ते दहा हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. शेतकऱ्यांकडून कापूस घेऊन गाठी तयार करून त्याची निर्यात करण्यासाठी जून-जुलैपर्यंत जिनिंग, प्रेसिंग उद्योग सुरू राहात होते. यंदा ते मार्चच्या पहिल्या आठवड्यातच बंद पडले आहेत. बाजारात चार दिवसांतून एक गाडी कापूस विक्रीस येतो. त्याला सध्या नऊ ते नऊ हजार ५०० असा दर मिळत आहे. असे असले तरी शेतकऱ्यांकडे कापूस नाही. काहींनी मात्र अजून चांगला दर मिळेल, अशी आशा बाळगून साचवून ठेवला आहे. बाजारात कापूस जवळपास येणे बंद झाले आहे. दुसरीकडे जिनिंग मिल्स चालविण्यासाठी रोजचा खर्च, वीजबिल, कर्मचाऱ्यांचा पगार इतर खर्च पाहाता जिनिंग मिल सुरू ठेवणे खर्चिक आहे. उत्पन्न कमी आणि खर्च अधिक, यामुळे जिल्ह्यातील ९९ टक्के जिनिंग यंदा बंद झाल्याची माहिती खानदेश जिनिंग-प्रेसिंग मिल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन यांनी दिली.

फक्त आठ लाख गाठींचे उत्पादन

यंदा १५ लाख गाठींचे उत्पादन करू, असे खानदेश जिनिंग, प्रेसिंग मिल ओनर्स असोसिएशनने ठरविले होते. असे असले तरी कापसाअभावी आतापर्यंत आठ लाख गाठींचे उत्पादन झाले आहे. १५ लाख गाठी निमिर्तीतून चार हजार पाचशे कोटींची उलाढाल होत असे. यंदा आठ लाख गाठीतून केवळ अठ्ठावीसशे कोटींची उलाढाल होईल. दोन हजार ते एकवीसशे कोटींचा तोटा या उद्योगाला कापसाअभावी सहन करावा लागणार आहे.

२० टक्के कापूस पेरा वाढणार

यंदा कपाशीला नऊ ते दहा हजारांचा प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. मात्र कापूसच नाही तर विकणार कोठून, अशी स्थिती आहे. यंदा मिळालेला कपाशीला चांगला भाव पाहाता येत्या खरीप हंगामात कापसचा पेरा २० टक्क्यांनी वाढेल, अशी माहिती कृषी विभागाने दिली. मे महिन्यात कापूस पेरण्या सुरू होतात. दोन महिन्यांचा कालावधी बाकी असला तरी शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीस सुरवात केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com