बारावीच्या पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला कॉप्यांचा सुळसुळाट

अर्धा तास अधिकचा मिळाल्याने समाधान, उत्तरे सांगण्याचे प्रकार
hsc exam English paper copy cases in jalgaon
hsc exam English paper copy cases in jalgaonsakal

जळगाव : जिल्ह्यात आज(ता. ४)पासून बारावीच्या ऑनलाइन परीक्षा सुरू झाल्या. पहिलाच पेपर इंग्रजीचा असल्याने अनेक ठिकाणी नेहमीप्रमाणे कॉप्या चालल्या. काही ठिकाणी तर संबंधित विषयांच्या शिक्षकांनी उत्तरेही सांगितल्याचा प्रकार घडला. परीक्षेतील पहिल्याच पेपर असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत सोडण्यासाठी पालकांनी गर्दी केली होती.

एक तास अगोदर बोलावून विद्यार्थ्यांची थर्मल तपासणी करण्यात आली होती. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंतर पहिल्यांदाच बारावीच्या ऑनलाइन परीक्षा आज घेण्यात आल्या. आज विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यासाठी अर्धातास जादा मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. अनेक ठिकाणी त्याच शाळा, महाविद्यालयात परीक्षा केंद्रे असल्याने कॉप्यांचा धुमाकूळ सुरू होता. परीक्षा केंद्राबाहेर पोलिस, होमगार्डचा बंदोबस्त होता. तरीही विद्यार्थ्यांच्या पालक, मित्रांनी संबंधित विद्यार्थ्यांना कॉप्या पुरविल्याचे चित्र पाहावयास मिळाले. पेपर सुटल्यानंतर अनेक ठिकाणी कॉप्याचा ढीग पडला होता. उन्हाची तीव्रता अधिक असल्याने पेपर सुटल्यानंतर पालक कानटोपी, रूमाल घेऊन परीक्षा केंद्राबाहेर पेपर सुटण्याची वाट पहात होते.

जिल्ह्यात एकही डिबार नाही

इंग्रजीचा पेपरला दरवर्षी कॉपी केल्याप्रकरणी विद्यार्थी ‘डिबार’ (कारवाई) होण्याची प्रकरणे होतात. इंग्रजीचा पेपर अभ्यास न करणाऱ्या विद्यार्थ्यांना कठीण जातो. यामुळे या पेपरला हमखास कॉप्या होतातच. तशा विद्यार्थ्यांवर कारवाईही होते. यंदा मात्र बारावीच्या परीक्षेत पहिला पेपर इंग्रजीचा होता. असे असताना एकही विद्यार्थी डिबार झालेला नाही हे विशेष होय. जिल्ह्यात एकूण ४८ हजार ६०३ विद्यार्थी परीक्षेला बसणे अपेक्षीत होते. त्यापैकी ४७ हजार ७९२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर ८११ विद्यार्थी गैरहजर होते. कॉपी प्रकाराला आळा घालण्यासाठी चार पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. बैठे पथक सर्व केंद्रावर गटशिक्षणाधिकाऱ्यांतर्फे नियुक्त करण्यात आले होते. जिल्हाधिकारी अभिजित राउत यांनी तहसिलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांनी नेमलेल्या तालुक्यातील परीक्षा केंद्रावर भेटी देत परीक्षेची पाहणी केली. शिक्षण विभागाची चार पथके नियुक्ती होती. प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी चोपडा तालुक्यात, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव यांनी चाळीसगाव तालुक्यात, निरंतर शिक्षणाधिकारी डॉ. डी. एम. देवांग यांनी भुसावळ तालुक्यात, डायटचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांनी जळगाव तालुक्यात भेटी दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com