मुळाणे बारीत ट्रॅक्टर पलटी; सहा ठार, सोळा जखमी

मृत व जखमी मजूर कुटुंबीय जळगाव जिल्ह्यातील
Tractor overturn in Mulane Bar
Tractor overturn in Mulane BarSakal

वणी - वणी-मुळाणे-कळवण रस्त्यावरील मुळाणे बारीत एकमेकांना जोडलेल्या दोन ट्रॅक्टर ट्रॉलींतून कामाच्या ठिकाणी घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरवरील चालकाचा ताबा सुटून ट्रॅक्टरसह दोन्ही ट्रॉल्या उलटल्या. यात तीन महिला, दोन पुरुष व एक बालिका असे सहा ठार, तर १६ जण जखमी झाले. जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पाच रुग्णवाहिकांच्या मदतीने नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मृत व जखमी जळगाव जिल्ह्यातील असून, यात मुलगी-आई व पती-पत्नीचा समावेश आहे.

गुरुवारी (ता. २) दुपारी तीनच्या सुमारास कळवणकडून मुळाणेमार्गे वणी परिसरात रस्त्याच्या कामासाठी पारोळा, भडगाव तालुक्यातील मजुरांना ट्रॅक्टरला दोन ट्रॉल्या जोडून त्यात कामाच्या साहित्यासह २१ मजुरांना ट्रॉलीत बसवून घेऊन येत असताना मुळाणे (मार्कंडेय) बारीत उतारावर ट्रॅक्टरचालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले. चालकाने ब्रेक लावण्याचा प्रयत्न करीत असताना ट्रॅक्टर ट्रॉली एकमेकांवर आदळून पलटी झाल्या. या वेळी ट्रॉलीमध्ये बसलेले मजूर साहित्यासह रस्त्यावर व घाटाच्या दरीत फेकले गेले. याच सुमारास समोरून येणाऱ्या अल्टो कारवर ट्रॉली येऊन थांबली. यात सुदैवाने कारमधील प्रवासी वाचल्याची माहिती घटनास्थळी देण्यात आली. अपघातात दोन पुरुषांसह एक महिला जागीच, तर गंभीर तिघांचा वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मृतांत वैशाली बापू पवार (वय ४), सरला बापू पवार (४५), पोपट गिरीधर पवार (४०, सर्व रा. उंदीरखेडे, ता. पारोळा), बेबाबाई रमेश गायकवाड (४०), आशाबाई रामदास मोरे (४०) व रामदास बळिराम मोरे (४८, सर्व रा. अंजनविहिरे, ता. भडगाव) यांचा समावेश आहे.

जखमींमध्ये सागर रमेश गायकवाड (२३, अंजनविहिरे, ता. भडगाव), संगीता पोपट पवार (४५), सुवर्णा पोपट पवार (१३), आकाश पोपट पवार (१५), गणेश बापू पवार (७), विशाल बापू पवार (११), बापू पवार (४५, सर्व रा. उंदीरखेडे, ता. पारोळा, जि. जळगाव), तनू दीपक गायकवाड (३), दीपक बाबूलाल गायकवाड (३०), अनुष्का दीपक गायकवाड (१), मनीषा दीपक गायकवाड (२४, रा. कुसुंबा, ता.जि. जळगाव) हिची दोन वर्षांची मुलगी, प्रिया संजय म्हस्के (८, रा. जामनेर, जि. जळगाव), लक्ष्मण अशोक शिंदे (२७), सुरेखा अशोक शिंदे (२२, रा. हिंगोणा, ता. धरणगाव, जि. जळगाव), ट्रॅक्टरचालक अजय नवल बोरसे (२१, रा. गिरड, ता. भडगाव) यांचा समावेश आहे.

जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. जखमींवर उपचारासाठी डॉक्टर असोसिएशनच्या डॉक्टरांनी रुग्णालयात धाव घेत ग्रामीण रुग्णालयात हजर एकमेव डॉक्टरला मदत केली. तसेच घटनास्थळी बाबापूर येथील युवकांनी, तर वणी येथील सामाजिक कार्यकर्ते व युवकांनी मदतकार्य केले. वेगवेगळ्या ठिकाणच्या पाच रुग्णवाहिकांद्वारे जखमींना वणी व जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com