अंबरनाथचा छोटा उस्ताद निघाला श्रीलंकेला!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जुलै 2016

अंबरनाथ - बाळाचे पाय पाळण्यात दिसतात... ही म्हण अंबरनाथमधील अथर्व लोहार याच्याबाबत तंतोतंत खरी ठरते आहे. सात वर्षांच्या अथर्वने तबलावादनात कौशल्य प्राप्त तर केलेच आहे; शिवाय या कौशल्याच्या बळावर आणि गुरूंनी त्याच्यावर दाखवलेल्या विश्‍वासाच्या जोरावर तो आपल्या बोटांची करामत श्रीलंकेत दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. 

अंबरनाथ - बाळाचे पाय पाळण्यात दिसतात... ही म्हण अंबरनाथमधील अथर्व लोहार याच्याबाबत तंतोतंत खरी ठरते आहे. सात वर्षांच्या अथर्वने तबलावादनात कौशल्य प्राप्त तर केलेच आहे; शिवाय या कौशल्याच्या बळावर आणि गुरूंनी त्याच्यावर दाखवलेल्या विश्‍वासाच्या जोरावर तो आपल्या बोटांची करामत श्रीलंकेत दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. 

अंबरनाथ येथील कैलासनगर येथे राहणारे मनोज लोहार यांचा सात वर्षांचा मुलगा अथर्व. अथर्वला नकळत्या वयापासूनच तालाचे आकर्षण होते. दोन वर्षांचा झाल्यावर हातात जी वस्तू येईल, त्यावर तो ठेका धरायचा. त्याचे हे तालाचे आकर्षण पाहून अथर्वच्या पालकांनी त्याला गुरुकृपा संगीत विद्यालयाच्या सुनील शेलार यांच्याकडे तबलावादनाचे रीतसर प्रशिक्षण घ्यायला पाठवले. काही दिवसांतच गुरू सुनील यांना आपल्या या चिमुकल्या शिष्यात मोठा कलावंत होण्याची क्षमता असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी अथर्वकडे खास लक्ष देण्यास सुरुवात केली. तबलावादनातील बारकावे अथर्व मनापासून आपल्या गुरूकडे शिकत आहे. गुरूंच्या तालमीत अथर्वमधील कलाकार घडत आहे. विविध ठिकाणी होणाऱ्या स्पर्धांत चिमुकला अथर्व आपल्या गुरुजनांच्या आशीर्वादाने सहभागी होऊन उपस्थितांची वाहव्वा मिळवत आहे. 

पुण्यात डिसेंबर 2015 मध्ये झालेल्या एका स्पर्धेत अथर्वने तबलावादनातील कौशल्य दाखवले. त्याच्या या तबलावादनातील कौशल्यामुळे बॅंकॉक येथे झालेल्या स्पर्धेसाठी त्याची निवड झाली. तिथे आलेल्या सुमारे सहा हजार स्पर्धकांतून अथर्वने त्याच्या चिमुकल्या बोटांनी दाखवलेल्या नजाकतीने त्याच्या वयोगटात असलेल्या सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. आता श्रीलंकेतील कोलंबो येथे होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अथर्व सज्ज झाला आहे. अथर्व यंदा दुसरीत शिकत आहे. रोजचा अभ्यास सांभाळून तो आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली तबलावादनाचा सरावही करत आहे. अशा या गुरू-शिष्याच्या जोडीला पुढील वाटचालीसाठी अंबरनाथमधील नागरिकांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: Sri Lanka went Ambernath small foremost!

टॅग्स