उत्तूर : युवकांच्या पुढाकारातून जीर्णोद्धार करण्यात आलेले महादेव मंदिर व परिसर. 
उत्तूर : युवकांच्या पुढाकारातून जीर्णोद्धार करण्यात आलेले महादेव मंदिर व परिसर. 

व्यसन सुटत गेले... पैसा साठत गेला... अन्‌ मंदिर सजत गेले 

उत्तूर - कोणतेही व्यसन वाईटच असते. मग ते दारूचे असो किंवा सिगारेट-तंबाखूचे. व्यसनाचा परिणाम आपल्या शरीरासह मनावरही होतो. जडलेल्या व्यसनाचा परिणाम जाणवू लागल्यावर काहीजण व्यसनमुक्ती केंद्रात जाऊन व्यसन सोडतात. त्यात त्यांना यशही येते. यामुळे त्यांचे जीवन सुखकर होते. उत्तूर येथील काही तरुणांनीही पुण्याला जाऊन व्यसनमुक्तीची शपथ घेतली. व्यसनात खर्च होणारी रक्कम साठवली आणि त्या रकमेतून महादेव मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यांना इतर निर्व्यसनी युवकांची साथ लाभली आणि गावात एक सुंदर मंदिर व बगीचा तयार झाला. 

व्यसनमुक्तीसाठी वर्षभरापूर्वी येथील काही युवक डोणजे (जि. पुणे) येथे गेले होते. तेथे असलेले सर्जेरावमामा यांनी त्यांना व्यसन सोडा, असा सल्ला दिला. यानुसार युवक गावी परतले व गावातील महादेव मंदिरातही जाऊ लागले. 

हे महादेवाचे मंदिर गावतलावाशेजारी बांधलेले आहे. दर सोमवारी पूजेच्या निमित्ताने येथे मोठी गर्दी असते. महाशिवरात्रीला अनेक कार्यक्रम होतात. दररोज मंदिरात जाणाऱ्या युवकांनी या मंदिराचा व परिसराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला. यासाठी मंदिरासमोरच सर्वांची बैठक झाली. काहींनी यासाठी वेगवेगळे उपक्रम सांगितले. 

व्यसनासाठी दररोज काही रक्कम खर्च व्हायची, त्या पैशाची बचत करण्याचा निर्णय झाला. मात्र यासाठी कोणत्याही नियम व अटी घालण्यात आल्या नाहीत. प्रत्येकाने प्रामाणिकपणे रक्कम देण्याचे मान्य केले. आठ दिवसांनी एका युवकाकडे काही रक्कम जमा होऊ लागली. बघता बघता जमा झालेल्या रकमेचा आकडा लाख रुपयांपर्यंत पोचला. यातून मंदिराची रंगरंगोटी झाली. गाभाऱ्यात फरशी बसवली. चहूबाजूंनी कठडा करून बगीचा तयार केला. यावर सुंदर हिरवे लॉन लावले. यासाठी साऱ्यांनी श्रमदान केले. हे सर्व गावातीलच असल्याने निर्व्यसनी काही युवकांनी त्यांना साथ दिली आणि व्यसनमुक्तीच्या पैशातून एक सुंदर मंदिर व परिसर झळाळून निघाला. या मंदिरामुळे गावतलावाच्या व गावच्या वैभवात भर पडली आहे. या युवकांचा आदर्श इतर गावातील तरुणांनी घेण्यासारखा आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com