सहकाराच्या गढूळ वातावरणात नवी पालवी

सहकाराच्या गढूळ वातावरणात नवी पालवी

कोल्हापूर - या पतसंस्थेचा एकही संचालक गेली ५० वर्षे मीटिंग भत्ता घेत नाही... पतसंस्थेचा एक रुपयाही संचालकांच्या चहापाण्यावर खर्च होत नाही.... एवढेच नव्हे, तर पतसंस्थेचा एकही कर्जदार थकबाकीदार नाही. म्हणजेच पतसंस्थेची या क्षणी एक रुपयाही थकबाकी नाही आणि एक दोघा संचालकांच्या इशाऱ्यावर नव्हे, तर सर्वच्या सर्व संचालकांनी एकमताने मंजुरी देईपर्यंत कर्जाचे प्रकरण मंजूर केले जात नाही. अशा पद्धतीने एखाद्या पतसंस्थेचा कारभार चालत असेल, असे सांगितले. तर कोणाला पटणारही नाही आणि मध्यंतरीच्या काळात पतसंस्थांत झालेला घोळ पाहता पतसंस्थांबद्दल विश्‍वासच उरलेला नाही; पण या परिस्थितीला एक पतसंस्था अपवाद आहे आणि पतसंस्था या संकल्पनेबद्दल पुन्हा चांगलं बोलायला निमित्त ठरली आहे. 

कदमवाडीतील श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या एकमार्गी आणि सरळमार्गी वाटचालीची ही कथा आहेत. पतसंस्थेतला घोळ, एकामागून एक बुडालेल्या पतसंस्था व एकूणच सरकारबद्दल गढूळ वातावरण तयार झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर या पतसंस्थेने काल खणखणीत ५० वर्षे पूर्ण केली आणि सहकार काही ठराविक लोकांमुळे बदनाम झाला असला तरी मूळ सहकार हे तत्त्व किती चांगले आहे, याचे प्रतीक म्हणूनच या संस्थेकडे पाहिले जाते. 

कोल्हापुरात गेल्या काही वर्षांत अक्षरश: पावसाळी छत्रीसारख्या पतसंस्था उघडल्या. ज्याला सहकाराचा गंध नाही, असे या काही पतसंस्थांचे पदाधिकारी झाले. काही वर्षांत स्वत:ला सहकार सम्राटच मानू लागले. पतसंस्थेच्या माध्यमातून स्वत:ची प्रसिद्धी करून घेऊ लागले. लोकप्रिय होण्यासाठी कर्ज वाटप कोणालाही करू लागले. कर्ज थकबाकीदारांकडून वसुली करण्यास डावा उजवा करू लागले. परिणाम व्हायचा तो झाला. अनेक पतसंस्था रांगेने बुडाल्या. ठेवीदारांचे पैसे बुडाले.अनेक ठेवीदारांना वेड लागायची वेळ आली. अनेक ठेवीदार अक्षरश: पतसंस्थेच्या दारात, संचालकांच्या दारात दिवस-दिवसभर आशेने बसले. तळतळाट करत राहिले, पण बुडालेल्या पतसंस्थांचे पदाधिकारी पुढे राजकारणात आले आणि कारवाईतून बचाव करण्यासाठी खेळी करत बसले. 

या पार्श्‍वभूमीवर ज्या काही ठराविक पतसंस्था टिकून राहिल्या. त्यांनी जरुर सहकाराची तत्त्वे जपली. त्यात श्री गणेश पतसंस्था आदर्शव्यवहाराचे प्रतीक ठरली. १९६७ रोजी ३६८० रुपये भांडवलावर ही पतसंस्था सुरू झाली. एक रुपया ते पाच रुपये बचत करणारे कष्टकरी लोक या पतसंस्थेचे सभासद झाले व कष्टकऱ्यांनीच व्यवस्थित कर्जफेड करत हे संस्थेचे रोपटे जगवले. माजी महापौर शिवाजीराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कडक नियमावली सर्वांनी पाळली. म्हणून आज या पतसंस्थेची एक पैसा थकबाकी नाही. एकही संचालक मीटिंग भत्ता घेत नाही, एक पैसा चहा पाण्यावर खर्च नाही आणि येथे कोणालाही एक कर्ज फेडल्याशिवाय दुसरे कर्ज मिळत नाही. असाच आदर्श इतरांनी घेतला तर पतसंस्था या शब्दाला पुन्हा आशेची पालवी फुटल्याशिवाय राहणार नाही. 

संचालक मंडळ
अध्यक्ष- रंगराव पाटील, उपाध्यक्ष-सुभाष घाटगे, संचालक - सदाशिव पोवार, नारायण पाटील, सुनील पाटील, पंडित संकपाळ, भैरू झोरे, महेश मांडरे, अरुण घाटगे, सायरा शेख, दीपाली रोकडे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com