खिळे... मोळे... पंक्‍चर आणि सामाजिक जाण...

खिळे... मोळे... पंक्‍चर आणि सामाजिक जाण...

कोल्हापूर - तुम्ही गाडीवरून जात असाल (मग गाडी कोणतीही असू दे, दुचाकी किंवा चार चाकी) आणि गाडी पंक्‍चर झाली. भर उन्हात तुम्हाला पंक्‍चर काढण्यासाठी मग काय काय करायला लागेल. हे आठवूनच कसेतरी झाले ना.. अशा कितीतरी अनेक वाहनचालकांना हे कष्ट पडू नयेत, म्हणून हिंदूराव कामते यांनी केवळ आपल्या नजरेत फरक केला.

सकाळी फिरायला जाताना दररोज रस्त्यावर पडलेले खिळे, मोळे, नटबोल्ट ते वेचतात. ते आपल्याबरोबर आणलेल्या छोट्याशा पिशवीत जमा करतात आणि घरी नेतात. दररोज फिरण्यासाठी जाण्याचा अडीच किलोमीटरचा रस्ता त्यांनी या आगळ्या-वेगळ्या सामाजिक जबाबदारीचे भान म्हणून खंडूनच घेतला आहे.

हिंदूराव कामते म्हणजे दादा. त्यांचा स्वतःचा फौंड्री उद्योग आहे. हनुमान नगरात ते राहतात. दररोज सकाळी फिरण्यासाठी जाण्याचा त्यांचा एक ग्रुप आहे. हनुमाननगर येथून चालण्यास सुरुवात करायची... ते हॉकी स्टेडियम चौक, आयसोलेशन हॉस्पिटलमार्गे चेतना विकास मंदिर चालण्यासाठी जाणे, हे त्यांच्या नित्यनियमाचे. या मार्गावरून चालताना प्रत्येक वेळी त्यांच्या ग्रुपमधील एकजण रस्त्यावर पडलेले खिळे, मोळे उचलून रस्त्याच्या कडेला फेकत असे. त्यांनी याविषयी विचारले असता गाडी पंक्‍चर झाल्याची घटना त्यांनी कामते यांना ऐकवली. यातूनच कामते यांनी रस्त्याच्या कडेला कशाला फेकायचे, आपणच गोळा करून नेऊ, असे ठरवले. 

दररोज सकाळी फिरायला बाहेर पडले, तरी हनुमाननगर ते चेतना विकास मंदिर या मार्गावर रस्त्यावर पडलेले खिळे, मोळे, नटबोल्ट उचलू लागले. पाच महिन्यांपासून त्यांनी हा उपक्रम न चुकता सुरू ठेवला. फौंड्री उद्योगात असल्यामुळे स्क्रॅपची किंमत काय आहे, हे त्यांना माहीत आहेच; परंतु त्यापेक्षा गाडी पंक्‍चर झाल्यानंतर एखाद्याला होणारा मन:स्ताप किती तापदायक असू शकतो, त्याची जाणीव त्यांना अधिक आहे. यात अमूक एकाची गाडीसाठी करतोय असे नाही, तर अडीच किलोमीटर रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक वाहनचालकांना होणारा त्रास या कामातून श्री. कामते व त्यांचा ग्रुप वाचवतात, हे नक्की.

जगण्याकडे समतोल दृष्टीने पाहण्याचा नजरेचा फरक असतो, तो फक्त मी केला. रस्त्यावर असंख्य खिळे, नट-बोल्ट पडले असतात. त्यामुळे गाडी पंक्‍चर होणे आणि त्याचा त्रास हे खरोखरच खूप मनाला त्रास देणारे आणि वेळखाऊही असते. नजरेचा फरक करून दररोज फिरायला जाताना हे मी आणि माझे सहकारी गोळा करतो. पाच महिन्यांत १० किलो खिळे, बोल्ट साठले. विशेषतः स्पीडब्रेकरजवळ याची संख्या अधिक असते. 
- हिंदूराव कामते

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com