स्मशानभूमीतील स्वच्छतादूत - जनार्दन खुडे

प्रकाश नलवडे
शुक्रवार, 25 मे 2018

सांगवडेवाडी - येथील स्मशानभूमीत गवताचे व घाणीचे साम्राज्य होते. रक्षाविसर्जन झाले की इतरत्र कचरा पडलेला असायचा. हे दृश्‍य पाहून सांगवडेवाडी न्यू इंग्लिश स्कूलमधील लिपिक जनार्दन मारुती खुडे यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून पाच वर्षांपासून स्मशानभूमीची स्वच्छता करण्याचा ध्यास घेतला आणि आज याठिकाणी स्मशानभूमीचे रूप पालटले आहे. स्वच्छ स्मशानभूमी कशी असावी, याचे उत्तम उदाहरण ठरले आहे. 

सांगवडेवाडी आणि सांगवडे या दोन गावांकरिता एकच स्मशानभूमी आहे. विविध धर्मांतील प्रथा परंपरेनुसार स्मशानभूमीतील विधीसाठी लागणारी झाडे, बेल, तुळस, हराळी, माका, केळी, डाळिंब, वड, पिंपळ येथे लावण्यासाठी खुडे यांनी पुढाकार घेतला आहे. दहनापूर्वी ज्या त्या धर्माप्रमाणे मंत्र ते स्वतः म्हणून रक्षाविसर्जन शेतात करण्याचा संदेश देत असतात.

शाळेतील लिपिकाचे काम करून एक सामाजिक बांधिलकी म्हणून हे काम करीत आहे. यातून आनंद मिळतो. ग्रामीण भागातील स्मशानभूमीचा कायापालट करण्यासाठी गावकऱ्यांनी सहकार्य केले आहे. करवीर तालुक्‍यातील सर्वांत चांगली स्मशानभूमी बनविण्याचा प्रयत्न आहे.
- जनार्दन खुडे

अंत्ययात्रेत उधळलेले पैसे गोळा करून झाडू सुपली कचरापेटी खरेदी केली आहे. रुग्णांना दवाखान्यात नेणे, त्यांना औषधोपचार करणे, औषधे आणून देणे यातही खुडे पुढे आहेत. स्मशानभूमीत रात्री दारू पिऊन बाटल्या फोडतात, काही शौचालयास जात होते. येथे मृतदेहाला अग्नी देण्यासाठी ठेवलेले रॉकेलही चोरीस गेले होते मात्र, येथील स्वच्छता पाहून हे सर्व प्रकार बंद झाले आहेत. 

दृष्टीक्षेपात

  •  रुग्णांचे जुने चष्मे, औषधे सीपीआर हॉस्पिटलमध्ये दान
  •  स्मशानभूमीत साहित्य ठेवण्यासाठी खोलीची व्यवस्था
  •  स्मशानभूमीसाठी लागणारे साहित्य उपलब्ध करणे
  •  स्वच्छतेचे काम मोफत पाच वर्षांपासून सुरू 
  •  सांगवडेवाडीची लोकसंख्या दोन हजार ३००
  •  सांगवडेची लोकसंख्या चार हजार ३३१
  •  पाच वर्षांत दोन्ही गावांतील ३००  पार्थिवांवर येथे अंत्यसंस्कार
  •  न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी, शिक्षक, सेवकांचेही योगदान
     
Web Title: Kolhapur News Janardan Khude special story