वडिलांच्या 56 वयाइतकी लावली झाडे! 

वडिलांच्या 56 वयाइतकी लावली झाडे! 

कोल्हापूर - "फादर्स डे'च्या निमित्ताने व्हॉटस्‌ऍप, फेसबुकवर शुभेच्छांचा पाऊस पडला. वडिलांबद्दलच्या भावना शब्दातून व्यक्त होत राहिल्या; पण या पोराने मात्र आपल्या वडिलांच्या वयाइतकी म्हणजे 56 झाडे एका दिवशी लावली व वडिलांबद्दलची कृतज्ञता वेगळ्या कृतीतून व्यक्त केली. एका ठिकाणी एवढी झाडे लावण्यासाठी टोप येथील चिन्मय मिशनच्या जागेत त्याला संधी देण्यात आली. 

प्रतीक बावडेकर या तरुणाने कालचा दिवस या उपक्रमात स्वतःला गुंतवून घेतले. 

प्रतीकचा सराफी व्यवसाय आहे. त्याला निसर्गाची खूप आवड आहे. त्याला कोणी एखादे झाड लावायला बोलावले तर तो स्वतः झाड लावतो. झाड स्वखर्चाने आणतो, खड्डा काढतो व केवळ झाड लावले म्हणजे काम संपले, असे न समजता पुढे वर्षभर त्या झाडाची काळजी घेतो. 

गेल्या वर्षभरात त्याने अशा पद्धतीने 338 झाडे लावली व जगवली आहेत. 

काल फादर्स डेच्या निमित्ताने त्याने त्याच्या वडिलांच्या वयाइतकी म्हणजे 56 झाडे लावून फादर्स डे साजरा करण्याचे ठरवले. त्यासाठी त्याला टोप येथील चिन्मय मिशनने मोठे बळ दिले. त्यांनी 56 झाडे लावण्याइतकी विस्तीर्ण जागा त्याला उपलब्ध करून दिली. प्रतीकसोबत या उपक्रमासाठी त्याचे समीर पंडितराव, अभिषेक भोसले, मनसून गोवावाला, संदीप जगताप, नितीन पोवार, शंकर हवालदार, राहुल नंदे हे सहकारी सोबत आले. चिन्मय ट्रस्टचे आत्मदेवानंतजी, हरीष मर्दा यांनीही सर्व मदत केली. त्यामुळे आपल्यासोबत आणलेली 56 झाडे प्रतीकने योग्य ते अंतर राखून लावली. 

ही झाडे लावताना त्याने वैविध्य जपले. कडुलिंब, ताम्हण, कदंब, अर्जुन, गुलमोहर, जांभूळ, बेल, बकुळ, रुद्राक्ष, करंजी, शंकासुर, मोगरा, अनंत, सोनचाफा, तगर, कुचला अशी वेगवेगळी व देशी झाडेच त्याने लावली. केवळ 56 झाडे एका दिवशी लावून तो थांबणार नाही. त्या झाडांना वेळोवेळी खत घालणार आहे. अधूनमधून जाऊन झाडांची देखभालही करणार आहे. 

निसर्गासाठी वेगळी भेट 
उपक्रमाबद्दल प्रतीक याची प्रतिक्रिया खूप बोलकी आहे. त्याच्या मते, वडिलांना शुभेच्छा देणे, एखादी छोटी गिफ्ट देणे सोपे आहे.  पण त्यांच्या वयाइतकी झाडे एका दिवशी लावणे व जगवणे ही वडिलांसाठी व निसर्गासाठीही वेगळी भेट आहे. म्हणूनच एकावेळी 56 झाडे लावण्याचा एक उपक्रम राबवला आहे. झाडे लावण्यासाठी विस्तीर्ण जागा उपलब्ध करून दिल्यास शाहू जयंतीच्या दिवशी 141 झाडे लावून तो शाहू महाराजांना अभिवादन करणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com