फौजींनी वाढवला सलोखा, केला शिक्षण प्रसार

फौजींनी वाढवला सलोखा, केला शिक्षण प्रसार

तुंग - पेरलं तसं उगवतं, असं म्हणतात. बंदुकीतल्या गोळ्या पेरल्या तर द्वेष उगवतो. देशाच्या सीमांचे रक्षण करताना सैन्यासाठी शत्रूला रोखण्याबरोबर तेथील जनतेशी सौजन्य व विश्‍वासाने वागणे महत्त्वाचे ठरते. स्थानिक तरुणांना दहशतवादाच्या मार्गापासून दूर ठेवण्याचे आव्हान असते. येथील हरी विष्णू पाटील यांनी तीस वर्षांत नक्षलग्रस्त, दहशतवादाच्या सावलीत असलेल्या भागात देशप्रेमाचे बीज पेरले. त्याला फळही तसेच आले. तरुण सैन्यात सेवा करण्याकडे ओढले गेले. त्यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा अनेकदा गौरव झाला. तुंगचे हरी पाटील त्यामुळेच लाखात एक फौजी ठरतात त्यामुळेच. 

सुभेदार पदावरून निवृत्त झालेले पाटील यांना खेळात रस, अभ्यासाचे वावडे. मल्लखांब, कुस्ती, क्रॉसकंट्रीची आवड. दहावीत तीनवेळा नापास झाले. पण धडपडले. अखेर उत्तीर्ण झाले. लष्करी सेवेचा मार्ग मोकळा झाला. ऑगस्ट १९८७ मध्ये भरती झाले. तोफखाना विभागात नियुक्‍ती झाली. हैद्राबादला प्रशिक्षण आणि पश्‍चिम बंगाल, चीन सीमा, झारखंड, जम्मू काश्‍मीरसह मध्य भारतातील नक्षलवादी क्षेत्रात काम केले. चार अतिरेक्‍यांचा त्यांनी खात्मा केला. सन २००५ मध्ये तत्कालिन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्यांचा गौरव झाला. हवालदार पदावरून नाईक सुभेदार म्हणून पदोन्नती झाली. 

जम्मू-काश्‍मीरमध्ये त्यांच्या युनिटने मल्लखांब, लेझीमचे सादरीकरण करून लक्ष वेधले. तत्कालिन मुख्यमंत्री गुलाब नबी आझाद, राज्यपाल एस. के. सिंग यांनीही कौतुक केले. तोफखान्यातील कामगिरीमुळे २००८ मध्ये राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते गौरवण्यात आले. सुभेदारपदी बढती मिळाली. सन २०१२ ते २०१५ मध्ये शिवसागर (आसाम) मध्ये नियुक्‍ती मिळाली. १०५ गावांत त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. देशप्रमाचे धडे दिले. त्या प्रयत्नांचे फळ म्हणून लोकांच्या सहभागाने पाच अतिरेक्‍यांना जेरबंद करणे शक्‍य झाले. तेथे शिक्षणाचा प्रसार कमी होता. त्यांनी फिरती शाळा सुरू केली. शिक्षणाचा प्रसार केला. सैन्यदलाचे प्रशिक्षण दिले. नक्षलवादाच्या मार्गावरील तरुणांना मूळ प्रवाहात आणले. वीस मुलांना सैन्यात भरती केले. तीस वर्षांत ४५० मुलांना प्रवाहात आणले.

फिरती शाळा, वाहतुकीला रस्ता
चीनच्या सीमेवरील रोचम, छागला हागममध्ये दळणवळण नव्हते. तेथे रस्ते निर्माण करण्यात पाटील यांनी खूप प्रयत्न केले. सहा फुटी रस्ता आठ फुटी केला. वीर मराठा ६७ फिल्ड रेजिमेंट विभागाने ही कामगिरी बजावली. ९९ किलोमीटर रस्ता झाल्याने तेथे पहिली तोफ नेता आली. तेथील गावांत ध्वजवंदनाचा कार्यक्रम सुरू झाला. मुलांना फुटबॉल, व्हॉलीबॉल, बॉक्‍सिंग शिकवले. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्थलसेना प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com