निशाच्या यशाने उजळल्या मोरे कुटुंबाच्या दिशा

निशाच्या यशाने उजळल्या मोरे कुटुंबाच्या दिशा

सांगली - तिच्या आई-वडिलांनी चार घरची धुणी-भांडी करून जगण्यासाठी संघर्ष केला. माझी चारही मुले शिकवणारच, असा ध्यास माऊलीने धरला. पत्र्याच्या खोलीत सात जणांच्या कुटुंबाने उभी हयात घालवली. थोरल्या म्हणजे...निशा मोरे हिने या परिश्रमाचे चीज केले. ती सी.एस. (कंपनी सेक्रेटरी) परीक्षेत यशस्वी झाली. रविवारी दुपारी निकाल समजला आणि तिचे कुटुंब आनंदाश्रूंनी न्हाऊन निघाले. निशाच्या या यशाने कुटुंबाच्या भविष्याच्या दिशाच उजळल्या.

निशा संजय मोरे ही कंपनी सेक्रेटरी परीक्षेत यश मिळवणारी जिल्ह्यातील यंदाची एकमेव परीक्षार्थी. देशातील तीस हजार विद्यार्थी परीक्षेसाठी बसले. निकाल आहे ०.८० टक्के. निशाचे यश झळाळून उठणारे. असे यश देशात अनेकांनी मिळवले असेल. मात्र, निशाचे यश वेगळे आहे. त्याच्या मोजमापाच्या फुटपट्ट्या वेगळ्याच असल्या पाहिजेत. परीट व्यवसाय करीत संजय व त्यांच्या पत्नी अनिता यांनी जिद्दीने संसार केला.

तीन मुली, एक मुलगा अशी चार मुले आणि आजी असे कुटुंब. निशा सर्वांत थोरली. दक्षिण शिवाजीनगरातील दामाणी हायस्कूलमध्ये शिकली. दहावीपर्यंत सारे शिक्षण दत्तक पालक योजनेतून झाले. पोहे म्हणजेच जेवणाचा डबा हेच पोषण. बालपण असे होरपळून गेले. आई-वडिलांसोबत तिने कपडे धुऊन आजवर सारे शिक्षण पूर्ण केले. दहावीला तिला ७० टक्के गुण मिळाले. बीसीएसाठी गुणवत्ता यादीप्रमाणे इस्लामपूरला प्रवेश मिळाला. मात्र, तिथे जाऊन शिकणे तिच्या आवाक्‍यातील नव्हते. निराशेत असताना तिला लाँड्री व्यवसाय करणाऱ्या काका बाळासाहेब यांनी धीर दिला. त्यांचा नियमित ग्राहक असलेल्या रामकृष्ण येडवे यांनी सी. एस. हा एक चांगला पर्याय आहे, असं सहज सांगितले.

निशाने तो सल्ला मनावर घेतला. आहे त्या स्थितीत ‘सी.एस.’ व्हायचा निर्धार केला. पहिल्याच वर्षी फाऊंडेशन परीक्षा पास झाली आणि आत्मविश्‍वास वाढला. स्वतः रामकृष्णही परीक्षा देत होता. त्याने तिला सर्व स्टडी मटेरियल दिले. रामकृष्ण आता त्यांचा हक्काचा भाऊ झालाय.  

चांगल्या इच्छीशक्तीमागे समाज उभा राहतो, याचा प्रत्यय निशालाही आला. सांगलीतील ‘सी.एस.’ प्रदीप  रासणकर पहिल्यांदा मदतीला धावले. त्यांच्यासह प्रसाद राजमाने, अमित शिंत्रे, उमेश माळी, विशाल जोशी या ‘सीएं’नी एकत्र येऊन कोचिंग क्‍लास सुरू केला. फी द्यायची निशाची ऐपत नव्हती. चौकशी करूनही क्‍लासला न आलेल्या निशाची व्यथा जाणत रासणकर तिच्या घरी धावले. तिच्या डोईवर ठेवलेला हात त्यांनी कायम ठेवला. दिनेश, रामानुजन सारडा, सुधीर शिंत्रे, धनंजय गाडगीळ, ओंकार शेटे असे अनेक जण निशाच्या प्रत्येक अडचणीवेळी उभे राहिले. त्यांचे ऋण व्यक्त करताना कुटुंबाचे डोळे पाणावले.

२०१४ पासून निशाला ‘सीएस’च्या अंतिम परीक्षेचे यश हुलकावणी देत होते. आत्मविश्‍वास टिकवून ठेवणे सोपे नव्हते. दहा प्रयत्नानंतर जेव्हा निकाल हाती आला तेंव्हा मोरे कुटुंब, त्यांची गल्ली आनंदाश्रूत बुडाली. पोरीने केलेल्या कष्टाची गल्लीला जाणीव होती. रोज सकाळी साडेसहा तिचा दिवस सुरू होई. स्वयंपाक पाणी करून साडेनऊला ड्युटी, सायंकाळी साडेसहापर्यंत नोकरी, पुन्हा घरकाम आणि रात्री साडेनऊनंतर अभ्यास. मध्यरात्री साडेबारापर्यंत अभ्यास चाले.

कुटुंब, भावंडासाठी खर्च उचलण्यसाठी तिने सीएसच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या काही ज्युनिअरचे घरी जाऊन वर्ग घेतले. त्यातून चार पैसे उभे राहिले. परीक्षेच्या महिन्याभरात तर १८-१८ तास तहानभूक विसरून अभ्यास केला. त्यावेळी धाकटी बहीण आरती स्वयंपाकाची जबाबदारी घ्यायची. आईने आयुष्यभर धुणी भांडी केली. माझ्या पोरी शिकवणारच हा निर्धार कायम ठेवला. निशाच्या लग्नाबद्दल लोक विचारायचे तेंव्हा ही अशिक्षित माऊली आत्मविश्‍वासाने माझी मुलगी शिकतेय. ती म्हणेपर्यंत तिचे लग्न करणार नाही, असे सांगायची.

कुटुंबातील उर्वरित तीनही भावंडे भरपूर शिकण्याच्या ऊर्मीने भारलेत. सर्वात भाऊ सिद्धार्थ सीएसडब्लएचा तर धाकटी रजनी सी.एस.च्या फायनलचा अभ्यास करतेय. एफवाय बीकॉमच्या पहिल्या वर्षात शिकणारी आरतीचे सी.ए. व्हायचे स्वप्न आहे. या सर्वांचीच आत्तापर्यंतची शैक्षणिक कामगिरी यशाची खात्री देणारी आहे. पार्ट टाईम जॉब करीत ही सारीच भावंडे शिकत आहेत. निशाने तर पुण्यात आर्टिकलशिपचे पहिले तीन हजारांचा पगार झाल्यानंतर शिलकीतल्या रकमेसह चार हजारांचे आईसाठी सोन्याचे मंगळसूत्र केले. मिळालेल्या पै-पैचा विचारपूर्वक खर्च करण्याचा तिच्यावरील संस्कारच त्यांनी निवडलेल्या आर्थिक क्षेत्रातील करिअरमध्ये नक्की यशस्वी करेल.

देणाऱ्यांचे ‘हात’ घेईन...
यशाचा आनंद साजरा करताना निशाने आपल्या वाटचालीतील अनेकांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. ती म्हणाली, ‘‘खूप कष्टाचा प्रवास होता. ‘दामाणी’मधील शिक्षकांपासून ते सी.एस.च्या तयारीच्या प्रत्येक टप्प्यावर भेटलेल्या परमेश्‍वररूपी माणसांनी तो सोपा केला. अशा सर्वांचे मोठे ऋण आहेत. ते कसे व्यक्त करू? आई-वडिलांच्या कष्ट आणि जिद्दीबद्दल मी या क्षणी काय बोलू? समाजाचे ऋण मी कधीही विसरणार नाही. माझ्यासारख्या अनेकींचा शिक्षणाचा प्रवास पूर्ण व्हावा, यासाठी भविष्यात मी नक्की वाटा उचलेन.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com