विचारमंथन, लोकसहभागाने कडेगाव करणार स्मार्ट

विचारमंथन, लोकसहभागाने कडेगाव करणार स्मार्ट

कडेगाव - ‘कडेगाव’ स्मार्ट सिटी ग्रुपने सोशल मीडियात केलेल्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यांचे मूर्त रूप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक व सुरेशबाबा देशमुख चौकात लोकसहभागातून अडीच लाख रुपये किमतीचे ‘दोन हायमास्ट एलईडी लॅंप’ बसवण्यास प्रारंभ झाला. नागरिकांच्या हस्तेच ते सुरू झाले.

दोन्ही चौक लवकरच प्रखर दिव्यांनी उजळणार आहेत. तर लोकसहभागातून  होत असलेल्या कामामुळे शहर विकास पर्व सुरू झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. सोशल मीडियाचा गैरवापर होताना त्याचा विधायक वापर  केला तर विकासकामांतही मोठे योगदान देता येते हे सिद्ध झाले आहे.

शहरात हवा तेवढा विकास झाला नाही. नगरपंचायतीकडे दोन कोटींवर निधी आला. प्रत्यक्ष ठोस काम झाले नाही. त्यामुळे काही युवक, नागरिकांनी एकत्र येऊन ‘कडेगाव स्मार्ट सिटी बनवू’ हा व्हॉटस्‌ॲप ग्रुप केला. त्यांच्यासह विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, अभियंते, नगरसेवक, प्रशासकीय अधिकारी सदस्य झाले.  

शहर विकासासंबंधी विचार मंथन सुरू झाले. नागरिकांनी प्रभागातील समस्या ग्रुपवर सांगायला सुरवात केली. नगरसेवकही दखल घेऊ लागले. समस्या सुटू लागल्या. अशाच विचारमंथनातून योगवर्ग सदस्य व नागरिकांनी दर रविवारी स्वच्छता अभियान सुरू केले. युवक वाढदिवस शहरात वृक्षारोपण करून करू लागले. आपलं शहर आपला विकास ही संकल्पना रुजू लागली. शासनस्तरावरही विविध प्रश्‍नांचा पाठपुरावा केला जात आहे. शासकीय योजनांवर विसंबून न राहता लोकसहभागात काही कामे उभारण्याची संकल्पना पुढे आली.

आता अनेक लोक पुढे येत आहेत. त्यातूनच छत्रपती शिवाजी महाराज चौकात संतोष डांगे व मित्रमंडळाच्या माध्यमातून माजी सरपंच पांडुरंग डांगे यांच्या  स्मरणार्थ व सुरेशबाबा देशमुख चौकात लिबर्टी ग्रुप, विजयदादा प्रतिष्ठानच्या माध्यमातून विजयदादा देशमुख यांच्या स्मरणार्थ अडीच लाख रुपये किमतीचे ‘दोन हायमास्ट एलईडी लॅंप’ बसवण्याचा निर्णय झाला. त्याचा आज प्रारंभ लोकांच्या हस्ते झाला.

हे दोन्ही चौक आता प्रखर उजेडाने उजळणार आहेत. हायमास्ट दिवे बसवण्याचे काम सुरू करताना चंद्रसेन देशमुख, सुरेश निर्मळ, राजाराम गरुड, संतोष डांगे, गुलाम पाटील, धनंजय देशमुख, विजय शिंदे, विजय गायकवाड, उदयकुमार देशमुख, शिवाजीराव देशमुख, सुरेश देशमुख, लक्ष्मण गायकवाड, ज्ञानेश्‍वर शिंदे, राजू जाधव, सुनील गाढवे, डॉ. सुरेश पाटील, शिवाजी चन्ने, राजाराम डांगे, महावीर माळी, भारत पालकर आदींसह कडेगाव स्मार्ट सिटी ग्रुपचे सदस्य, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

गट, मतभेद विरले... 
लोकसहभागातून हायमास्ट एलईडी लॅंप बसवण्याच्या प्रारंभाच्या कार्यक्रमाला सर्व राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते राजकीय व पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एका व्यासपीठावर आले. हे विचार मंथनामुळे शक्‍य झाले, अशी चर्चा शहरांत सुरू झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com