जग सोडताना दिले चौघांना जीवनदान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 ऑक्टोबर 2016

नांदेडमध्ये ग्रीन कॉरिडॉर; मुंबई-पुणे-औरंगाबादकडे अवयव रवाना
पुणे - नांदेडमध्ये मेंदूचे कार्य थांबलेल्या तरुणाचे यकृत पुण्याला, हृदय मुंबईला आणि औरंगाबाद येथील दोन रुग्णांना मूत्रपिंड दान करण्यात आले. "त्या' तरुणाने हे जग सोडताना चार जणांना जीवनदान दिले.

नांदेडमध्ये ग्रीन कॉरिडॉर; मुंबई-पुणे-औरंगाबादकडे अवयव रवाना
पुणे - नांदेडमध्ये मेंदूचे कार्य थांबलेल्या तरुणाचे यकृत पुण्याला, हृदय मुंबईला आणि औरंगाबाद येथील दोन रुग्णांना मूत्रपिंड दान करण्यात आले. "त्या' तरुणाने हे जग सोडताना चार जणांना जीवनदान दिले.

अपघातात जखमी झालेल्या पस्तीस वर्षीय तरुणाच्या मेंदूचे कार्य थांबल्याचे नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्‍टरांनी जाहीर केले. या तरुणाचे अवयव मरणोत्तर दान करता येतील, असेही डॉक्‍टरांनी नातेवाइकांना सुचविले. त्याला नातेवाइकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे हृदय, यकृत आणि मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेत असलेल्या चार रुग्णांना जीवनदान मिळाले.

नांदेडमधील रुग्णालय ते श्री गुरुगोबिंदसिंघ विमानतळापर्यंत जलदगतीने अवयव पोचण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर केला होता. येथून हृदय मुंबईकडे तर यकृत पुण्याकडे रवाना केले. अवयव वाहतुकीसाठी नांदेडचे जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी विविध यंत्रणांशी समन्वय साधला. ग्रीन कॉरिडॉरसाठी पोलिस यंत्रणा, वाहतूक व्यवस्था, विमानतळाशी निगडित व्यवस्था आणि आरोग्य यंत्रणांना गतिमान केले. विष्णुपुरीतून विमानतळापर्यंत हेलिकॉप्टरनेही हृदय पाठविण्याची शक्‍यता पडताळून पाहण्यात आली.

अखेरीस विष्णुपुरी ते विमानतळ हे अंतर अवघ्या 13 मिनिटांत पार केले.
अवयवदानासाठी औरंगाबाद येथील विभागीय समितीशी संपर्क साधला. अवयवदाता आणि प्रत्यारोपण करावयाचा रुग्ण यांच्याबाबतच्या वैद्यकीय चाचण्या तसेच आनुषंगिक सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर आज सकाळी हृदय घेऊन जाण्यासाठी मुंबईतील फोर्टीस हॉस्पिटलचे हृदय-प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. अन्वय मुळे, डॉ. विजय शेट्टी, डॉ. संदीप सिन्हा तर यकृत घेऊन जाण्यासाठी पुण्यातील रुबी हॉस्पिटलचे डॉ. कमलेश बोकील, मूत्रपिंड घेऊन जाण्यासाठी औरंगाबादच्या कमल नयन बजाज रुग्णालयाचे डॉ. अजय ओसवाल नांदेडमध्ये दाखल झाले.

डॉ. चव्हाण महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. काननबाला येळीकर, डॉ. पी. टी. जमदाडे, डॉ. राजेश आंबुलगेकर, डॉ. श्रीधर येन्नावार, डॉ. नितीन नंदनवनकर, डॉ. डी. पी. भुरके, डॉ. एच. व्ही. गोडबोले यांनीही आरोग्य संकुलाच्या रुग्णालयातील शस्त्रक्रियागृह सज्ज ठेवली. दुपारी दोन वाजून तेरा मिनिटांनी हृदय घेऊन डॉ. मुळे विमानतळाकडे रवाना झाले. अवघ्या 13 मिनिटांत हा ताफा विमानतळावर पोचला आणि दोनच मिनिटांत हृदय घेऊन विमान मुंबईकडे झेपावले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात यकृत घेऊन पुण्याचे पथक विमानाने रवाना झाले. तर औरंगाबादचे पथक मूत्रपिंड घेऊन मोटारीने रवाना झाले.

दरम्यान, पुण्यातील या वर्षातील 46 वे यकृत प्रत्यारोपण रुबी हॉल क्‍लिनिक येथे रात्री उशिरापर्यंत सुरू होते.