नियतीने टेकले जिद्दीपुढे "हात'

sunita-pawar
sunita-pawar

पुणे - हातावरचे पोट भरण्यासाठी बिगारी काम करताना विजेच्या तारेला सुनीता पवार यांचे हात चिकटले. उपचारादरम्यान दोन्ही हात कोपरापासून काढावे लागले. हे संकट कमी की काय? नवऱ्याने त्यांना सोडले. नियतीपुढे हार न मानता आलेल्या संकटांबरोबर त्यांनी झुंज दिली. बघता-बघता हात गमावूनही घरकामाची किमया त्यांनी साधली आहे. "माझ्या जिंदगीचं वाटोळं झालंय; पण माझ्या लेकरांना मला जगवायचंय. त्यांना शिकवायचंय. मग मी आत्महत्या कशाला करू? मला काहीही काम दिले, तरी मी करेन.' त्यांचा हा आशावाद नैराश्‍याच्या गर्तेत सापडलेल्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे.

पाच-सात वर्षांपूर्वीची गोष्ट. गवंडी काम करणाऱ्या नवऱ्याच्या हाताखाली सुनीता पवार माल देण्याचे काम करत होत्या. वाघोली येथील एका बांधकामाच्या ठिकाणी झालेल्या अपघातात सुनीताताईंचे दोन्ही हात जळाले. उपचारावेळी ते कोपरापासून कमी करावे लागले. त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या महिलेचा विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाला. या घटनेतून सावरत असतानाच नवऱ्यानेही त्यांच्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी त्यांच्या पोटात सात महिन्यांचे बाळ होते. हे सगळे धक्‍के पचवत सुनीताताईंनी लढण्याचा निर्णय घेतला. बिल्डरला भरपाई मागितल्यानंतर त्यांनीही सरकारी उत्तरे देत हाकलून लावले. अशा परिस्थितीत दुसरीतूनच शिक्षण सोडलेल्या छोट्या भावाने त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी स्वतःच्या छोट्याशा खांद्यावर घेतली.

सुनीताताई म्हणतात, ""भाऊ मजुरी करून जगवतो आम्हाला. आता माझे हात पूर्वीपेक्षा मजबूत झाले आहेत. याच हातांनी तर घरातील सगळी कामे करते. मला दोन मुलं, भावाकडे बघून जगायचं. मला मुलांना शिकवायचे आहे. त्यांच्या पायावर उभे करायचे आहे.'' पिंपरी-चिंचवडचे नगरसेवक बापू काटे यांच्या प्रयत्नांमुळे सुनीताताईंना पिंपळे सौदागरमधील गोविंद गार्डन येथे छोटीशी झोपडी मिळाली आहे. त्यातच आठ महिन्यांचे बाळ, सात वर्षांची मुलगी आणि छोट्या भावाबरोबर त्या प्रतिकूल परिस्थितीत राहत आहेत. हात गमावूनही स्वयंपाकापासून मुलांना अंघोळ घालण्यापर्यंत घरातील सर्व कामे त्या नेटकेपणाने करतात. त्यांच्यातील या गुणाचे परिसरातील स्त्रियांनाही चांगलेच कौतुक आहे. सुनीताताईंची सात वर्षांची रेणू सध्या मराठी शाळेत दुसरीमध्ये शिक्षण घेत आहे.

हात नाहीत, याचे मला कधीच वाईट वाटत नाही. आत्महत्येचा विचार तर कधीच मनात आला नाही आणि कोणी तसा विचार करूही नका. दिवस बदलतात. समाज खूप चांगला आहे; पण तो तरी किती मदत करणार. माझ्यात काम करण्याची जिद्द आहे. माझ्या हातांना कामाची आणि माझ्या पिलांसाठी छोट्याशा घरकुलाची गरज आहे. या दोन्ही गोष्टी नक्कीच मिळतील.
- सुनीता पवार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com