वृक्ष, वाघ वाचविण्यासाठी हेमराजची धडपड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 ऑगस्ट 2016

लहानपणी वृक्षराजीच्या सावलीत खेळल्यामुळे वृक्षांच्याबाबत त्याच्या मनात प्रेम निर्माण झाले. हळूहळू वृक्ष आणि प्राणी याबाबत तो माहिती मिळवू लागला. शहरात होणारी वृक्षतोड रोखण्यासाठी तो सातत्याने पुढाकार घेत असतो. आतापर्यंत हेमराज शिंदे या तरुणाने शंभरावर वृक्षांना तोडण्यापासून वाचवले आहे. इतकेच नव्हेतर याच आठवड्यात 28 व 29 ला त्याने व्याघ्र संवर्धन रॅलीचे आयोजन केले आहे, त्याच्या विषयी... 

 

लहानपणी वृक्षराजीच्या सावलीत खेळल्यामुळे वृक्षांच्याबाबत त्याच्या मनात प्रेम निर्माण झाले. हळूहळू वृक्ष आणि प्राणी याबाबत तो माहिती मिळवू लागला. शहरात होणारी वृक्षतोड रोखण्यासाठी तो सातत्याने पुढाकार घेत असतो. आतापर्यंत हेमराज शिंदे या तरुणाने शंभरावर वृक्षांना तोडण्यापासून वाचवले आहे. इतकेच नव्हेतर याच आठवड्यात 28 व 29 ला त्याने व्याघ्र संवर्धन रॅलीचे आयोजन केले आहे, त्याच्या विषयी... 

 

हेमराज (बबलु) बापूराव शिंदे या तरुणाचे शिक्षण 12वी विज्ञान आणि फार्मसी असे झाले आहे. सध्या तो खासगी नोकरी करतो. पिंप्राळा येथील तो रहिवासी असून वृक्षलागवड, प्राण्यांची तस्करी रोखणे या सारखी कामे तो करत असतो. लहानपणी हेमराज वृक्षांच्या सावलीत रमायचा. वृक्षांच्या सावलीचे त्याला मोठे कौतुक वाटायचे. पुढे या वृक्षांना जर कोणी त्रास दिला तर त्याला वाईट वाटायचे. पण पुरेशी माहिती अन अभ्यास नसल्याने काही करता येत नव्हते. मग त्याने ठरवून वृक्षतोडबाबत माहिती मिळवायला सुरवात केली. भरपूर वाचन केले आणि त्याच्या असे लक्षात आले की आपण राहतो त्या भागातील बरेच वृक्ष असे आहेत, ज्यांची तोड करणे गुन्हा ठरू शकते. अशा वृक्षांची तोड त्याला जिथे दिसेल तेथे तो हजर होतो आणि ही तोड थांबवतो. यासाठी त्याने आतापर्यंत काही गुन्हे देखील दाखल केले आहेत. मोठ-मोठे वृक्ष त्याने तोडीपासुन वाचवले आहेत. वृक्षांच्या संदर्भात काम करताना जंगलासंदर्भात त्याची आवड वाढू लागली. वन्य प्राण्यांचा देखील तो अभ्यास करू लागला. या अनुषंगाने त्याचा संबंध वन्यजीव संरक्षण संस्थेशी त्याचा संबंध आल्यानंतर जोमाने हेमराज काम करू लागला. त्याला या क्षेत्रात रवींद्र सोनवणे, राहुल सोनवणे, बाळकृष्ण देवरे, योगेश गालफाडे, ऋषी राजपूत, नरवीरसिंग रावल आदींनी मार्गदर्शन केले आहे. 

 

शंभरावर वृक्ष वाचवले 

गेल्या सहा वर्षांपासून हेमराज वृक्षतोड रोखण्यासाठी प्रयत्न करतो आहे. यात त्याला चांगले यश देखील आले आहे. त्याने आतापर्यंत शंभरावर वृक्ष वाचवले आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण रोजलॅन्ड शाळेत झाले आहे, याच शाळेत एकदा वृक्षतोड होत असल्याचे त्याला समजले, तेव्हा हेमराज शाळेच्या विरोधात उभा राहिला. त्याने तेथील वृक्षतोड रोखलीच. 

 

पाचशे किलो प्लास्टिक गोळा 

दरवर्षी काही मुलांना घेऊन हेमराज मनुदेवी परिसरात जात असतो. धबधब्यापासुन ते पार्किंग व्यवस्थेपर्यंत या मुलांना घेऊन तो तेथे पडलेला प्लास्टिक गोळा करतो. एकावेळी साधारणपणे पाचशे किलोपर्यंत हा प्लास्टिक गोळा होतो. दरवषर्क्ष तो हा उपक्रम राबवत असतो. 

 

प्राणी तस्करी रोखले 

आपल्या भागात घोरपड, पक्षी, मांडुळ आदी प्राण्यांची तस्करी केली जाते. अशा तस्करांच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यांचे प्रयत्न हेमराजने हाणून पाडले आहेत. घोरपड, तितर, मांडुळ आदी प्राणी त्याने वाचवले आहेत. प्राणी तस्करांचे समुपदेशन करून त्यांना प्राणी संवर्धनाच्या कामी लावले आहे. 

 

व्याघ्र गणनेसाठी पुढाकार 

हेमराजला वाघाचे आकर्षण. जंगलातील अतिशय महत्त्वाचा प्राणी म्हणजे वाघ आणि त्याचे संवर्धन, संगोपन व्हायला पाहिजे यामतावर तो ठाम झाला. त्यानंतर तो मुंबई-कोकण व्याघ्र गणना रॅलीत सहभागी झाला होता. असाच उपक्रम आपल्याकडे घेता येईल का हा विचार करून त्याने 28व29 जुलै ला व्याघ्र दिनाच्या अनुषंगाने मोटरसायकल रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीत शंभरावर निसर्गप्रेमी सहभागी होणार आहेत. पथनाट्य, चित्रफीत, अरण्यवाचन असा भरगच्च कार्यक्रम दोन दिवसात होणार आहे. वन्यजीव संरक्षण संस्था, जळगाव आणि यावल वन विभाग आणि टीसीआरसी (टायगर कन्झरवेशन रिसर्च सेंटर मुंबई) यांचे सहकार्यातून ही रॅली पार पडणार आहे. वाघ आणि मानव यांची परस्पर साखळी कशी महत्त्वपूर्ण आहे, वाघ वाचविण्यासाठी आपण काय करायला पाहिजे आदी गोष्टी हेमराज या रॅलीतुन सादर करणार आहे.