जिल्हाधिकाऱ्यांनी फुलविली बंगल्यात शेती

विनोद इंगोले - सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 ऑगस्ट 2016

रेनवॉटर हार्वेस्टिंग केल्याने शेतातील विहिरीची जलपातळी वाढली आहे. तीन शेळ्या, एक बोकड व एक गाय पाळली. सेंद्रिय शेती पद्धतीसोबतच त्याला पशुपालनाच्या पूरक व्यवसायाची जोड दिली तर शेती फायद्याची होते, असे पहिल्या वर्षीच्या अनुभवातून वाटले. यंदा ज्वारी, बाजरीला पक्ष्यांचा त्रास झाला. माझे वडील शेतकरी होते. त्यामुळे मला शेती कसताना अडचण गेली नाही. 
- जी. श्रीकांत जिल्हाधिकारी, अकोला. 

नागपूर - शेतीसमोरील आव्हानांचा वेध घेता यावा, याकरिता अकोल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी आपल्या बंगल्याच्या परिसरातील पडीक जमिनीवर मूग, उडदाची लागवड केली आहे. या शेतीचे व्यवस्थापन सेंद्रिय पद्धतीने करणाऱ्या या ध्येयवेड्या अधिकाऱ्याने आपल्या या शेतीला गायी व शेळीपालनाच्या माध्यमातून पूरक व्यवसायाची जोड देत सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्‍का दिला आहे. 
अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकरीहित जपत त्यांच्याकरिता विविध उपक्रम राबविले आहेत. मुंबई उच्च न्यायालयानेदेखील त्यांच्या कृतिशीलतेचे कौतुक केले होते. त्यानंतर आता त्यांनी थेट बंगल्याच्या परिसरातच शेती फुलविली आहे. अकोल्याच्या बसस्थानकापासून अवघ्या काही अंतरावरच हा परिसर आहे. या परिसराला त्यांनी शेतशिवारात परावर्तित केले.

परसबाग आणि पारंपरिक पिके
जिल्हाधिकारी बंगला सहा एकरांत आहे. यातील एक एकरचा परिसर वगळता उर्वरित क्षेत्रावर पीक घेण्यात आले. गेल्या वर्षी तुरीत सोयाबीनचे आंतरपीक होते. परसबागेतून घरच्या भाजीपाल्याची गरज भागविण्यावर भर दिला गेला आहे. गेल्या वर्षी रबी हंगामात गहू, त्यापूर्वी उन्हाळी भुईमूग घेण्यात आला. अडीच क्‍विंटल झालेल्या भुईमुगापासून घाणीवरून काढलेल्या तेलाचाच वापर जिल्हाधिकारी रोजच्या आहारात करतात. फणस तसेच विविध जातींच्या आंब्याची लागवडही केली आहे. यंदा शेतीत वाल, गवार, टोमॅटो, मिरची, वांगी, भेंडी, पालक, कोथिंबीर अशी भाजीपाला पिके आहेत. तुरीत भुईमुगाचे आंतरपीक, मूग, उडीद, ज्वारी, बाजरीची लागवड आहे. मुगाच्या शेंगा भरल्या आहेत. उडीद फुलोऱ्यावर आहे.