तरुण भागवताहेत  ११ गावांची ‘तहान’

सुवर्णा चव्हाण
गुरुवार, 18 मे 2017

पुणे - मराठवाडा अन्‌ विदर्भात दुष्काळ. तसा पुण्यातही...गावे अन्‌ तालुकेही तहानलेले... पाणी मिळविण्यासाठी लोकांना अक्षरशः जिवाचे रान करावे लागत आहे. अशा परिस्थितीत बारामतीतील ११ गावांची तहान भागविण्याचा विडा ‘तहान’ संस्थेतील तरुणांनी उचलला आहे. दुष्काळी गावांना टॅंकर पाठवून त्यांची तहान भागविण्याचा प्रयत्न हे तरुण करणार आहेत. या उपक्रमाची सुरवात बुधवारी करण्यात आली. सुरवातीला सोनवडी सुपे आणि खराडेवाडी या दोन गावांना टॅंकर पाठविण्यात आले असून, १८ जूनपर्यंत चालणाऱ्या उपक्रमांतर्गत बारामतीतील गावांना सुमारे ५०० टॅंकर पाठविण्याचे नियोजन आहे.

पुणे - मराठवाडा अन्‌ विदर्भात दुष्काळ. तसा पुण्यातही...गावे अन्‌ तालुकेही तहानलेले... पाणी मिळविण्यासाठी लोकांना अक्षरशः जिवाचे रान करावे लागत आहे. अशा परिस्थितीत बारामतीतील ११ गावांची तहान भागविण्याचा विडा ‘तहान’ संस्थेतील तरुणांनी उचलला आहे. दुष्काळी गावांना टॅंकर पाठवून त्यांची तहान भागविण्याचा प्रयत्न हे तरुण करणार आहेत. या उपक्रमाची सुरवात बुधवारी करण्यात आली. सुरवातीला सोनवडी सुपे आणि खराडेवाडी या दोन गावांना टॅंकर पाठविण्यात आले असून, १८ जूनपर्यंत चालणाऱ्या उपक्रमांतर्गत बारामतीतील गावांना सुमारे ५०० टॅंकर पाठविण्याचे नियोजन आहे. या टॅंकरचा सर्व खर्च हे तरुण आपला पॉकेटमनी व लोकसहभागातून उचलणार आहेत.

संस्थेतील तरुण-तरुणींनी बारामतीमधील गावे, कुटुंबे, पाडे, घरे आणि वस्त्यांचे सर्वेक्षण केल्यानंतर येथे मोठी पाणीटंचाई असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

संस्थेतील सुमारे ४० जण या कामाला हातभार लावत आहेत. बारामतीतील उंडवडी सुपे, कारखेल, सोनवडी सुपे, अंजनगाव, खराडेवाडी, कळोली, नरोली, देऊळगाव रसाळ अशा विविध गावांना टॅंकर पुरविण्यात येणार आहेत. 

याबाबत संस्थेच्या समन्वयिका सुषमा पाटील-जगताप म्हणाल्या, ‘‘काहीतरी वेगळे करावे, यासाठी रवीना मोरे आणि सहकाऱ्यांनी संस्था स्थापन केली आणि दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. गेल्या वर्षी महिनाभरात २१ गावांना ५५० टॅंकर पुरवू शकलो. यंदाही सर्वेक्षण करून दुष्काळी गावांना मदतीला सुरवात केली आहे. त्याला प्रतिसादही चांगला मिळत असून, या उपक्रमासाठी लोकसहभागाची आवश्‍यकता आहे.’’

महिनाभर चालणार उपक्रम
‘तहान’ संस्थेकडून दहा हजार ते २२ हजार लिटरचे पाण्याचे टॅंकर पुरविले जाणार आहेत. एका टॅंकरची किंमत अडीच हजार रुपये आहे. त्यामुळे गावातील प्रत्येक कुटुंबाला २०० लिटर पाणी प्राप्त होणार आहे. हा उपक्रम एक महिना चालणार आहे. याशिवाय संस्थेकडून रेन वॉटर हार्वेस्टिंग, ओढा खोलीकरण आणि गावकऱ्यांना सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेची माहिती देणे, असे उपक्रमही राबविण्यात येणार आहेत.