मसाला उद्याेगातून भारतीताईंनी साधला 'उत्कर्ष'

Agriculture success story in Marathi Bharati Patil Utkarsh Brand
Agriculture success story in Marathi Bharati Patil Utkarsh Brand

काळा मसाल्यासोबत शेंगा, कारळा, जवस चटण्यांचे उत्पादन करून वडाळा  (जि. सोलापूर) येथील सौ. भारती पाटील यांनी लघू प्रक्रिया उद्योगास सुरवात केली. बाजारपेठेत उत्पादनांना स्वतंत्र ओळख होण्यासाठी त्यांनी ‘उत्कर्ष' ब्रँड तयार केला. स्थानिक बाजारपेठेच्या बरोबरीने पुणे, मुंबई शहरांतही त्यांच्या उत्पादनांना वाढती मागणी आहे. 

वडाळा (जि. सोलापूर) येथील सौ. भारती विठ्ठल पाटील या सुरवातीपासूनच कष्टाळू आणि धडपड्या स्वभावाच्या. बारावीपर्यंत शिकलेल्या, स्वतःचा काही तरी लघू उद्योग असावा, स्वावलंबी व्हावं, असं त्यांना सतत वाटायचं. पती खासगी नोकरीत, एकुलता एक मुलगा. त्याचं शिक्षण, कौटुंबिक खर्चाचा आर्थिक मेळ बसत नव्हता. त्यामुळे प्रत्येकवेळी वेगळे प्रश्‍न, अडचणी असायच्या. याच दरम्यान १९९८ च्या सुमारास सौ. भारती पाटील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या बचत गट चळवळीशी जोडल्या गेल्या. पतीनेही त्यांची आवड, धडपड पाहून त्यांना साथ दिली. त्या घराबाहेर पडल्या. त्यातूनच त्यांना स्वावलंबनाचे, व्यावसायिकतेचे धडे मिळाले. साधारण २००५ पर्यंत त्या ग्रामीण विकास यंत्रणेच्या सोबत होत्या. या काळात बचत गटाच्या विविध उत्पादनांच्या विक्रीची जबाबदारी त्यांनी पार पाडली. २००५ पासून बचत गटाच्या माध्यमातून सोलापुरी चादर विक्रीचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. त्यासाठी गोवा, दिल्ली, मुंबई, बंगलोर, बेळगाव, हुबळी या शहरातील विविध प्रदर्शनांत भाग घेऊन चादरींची विक्री केली. या उद्योगातून चार पैसे मिळाल्यानंतर हळूहळू आर्थिक प्रगती सुरू झाली. पण हे करत असताना  स्वतःच्या लघू प्रक्रिया उद्योगाची इच्छा मात्र राहून गेली होती. याकडे २०१३ मध्ये त्यांनी लक्ष दिले. 

मसालानिर्मिती उद्योगाची सुरवात 
बचत गटाच्या चळवळीत फार पूर्वीपासूनच कार्यरत असल्याने विविध उत्पादने आणि विक्री तंत्राची भारतीताईंना चांगली माहिती होती. या अभ्यासातून त्यांनी मसाला उद्योग निवडला. जिल्हा खादीग्रामोद्योग महामंडळाकडे प्रस्ताव दिला. बॅंक ऑफ बडोदामधून त्यांना अडीच लाखांचे आर्थिक साहाय्य मिळाले. टप्प्याटप्प्याने भारतीताईंनी गेल्या चार वर्षात उत्कर्ष महिला लघू उद्योग उभा केला. उत्पादनाची स्वतंत्र ओळख तयार होण्यासाठी त्यांनी `उत्कर्ष' ब्रॅण्ड तयार केला. बाजारपेठेची मागणी लक्षात घेत शेंगा चटणी, काळा मसाला, कारळा चटणी, जवस चटणीचे उत्पादन सुरू केले. चटणी उद्योगाच्या दृष्टीने भारतीताईंनी मिरची कांडप यंत्र आणि अन्य साहित्य खरेदी केले. आज त्या मसाला निर्मिती उद्योगात चांगल्या स्थिरावल्या आहेत.  

घरच्या मसाल्याची चव 
भारतीताई शेंगा, कारळा, जवस चटणी बरोबरीने काळा मसाल्यामध्येही घरी तयार केलेला खास मसाला वापरतात. मिठाचे प्रमाणही विशिष्ठ पातळीपर्यंत मर्यादित असते. त्यामुळे चटणी, मसाल्यास एक वेगळीच चव, रंग आणि गुणवत्ता मिळते. उत्पादनाचा दर्जा, गुणवत्तेसाठी भारतीताई काटेकोर आहेत. गुणवत्ता चांगली असल्याने उत्पादनांना ग्राहकांकडून मागणी वाढत आहे. 

चटण्यांना विशेष मागणी 
आज चटणी, मसाला निर्मिती व्यवसाय एवढा स्थिरावला आहे की, दरमहा २५० किलो काळा मसाला, ३५० किलो शेंगा चटणी, कारळा चटणी ५० किलो आणि जवस चटणीची ५० किलोपर्यंत विक्री होते. विक्रीसाठी ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन २०० ग्रॅमची पाकिटे भारतीताईंनी तयार केली आहेत. हे पाकीट ५० रुपयाला विकले जाते. ग्राहक आणि किरकोळ विक्रेते यांच्या मागणीनुसार पाकिटांची विक्री होते. त्याचबरोबरीने दहा किलोच्या पॅकिंगमध्ये चटणी, मसाल्याची विक्री केली जाते. काळा मसाला प्रति किलो ३५० रुपये आणि शेंगदाणा चटणी, जवस चटणी, कारळा चटणी प्रति किलो २५० रुपये असा दर आहे. 

शाश्वत उत्पन्नाची सोय 
चटण्या करण्यासाठी भारतीताई शेतकऱ्यांकडून थेट मिरचीची खरेदी करतात. त्याशिवाय गरजेनुसार बाजारपेठेतूनही मिरची खरेदी केली जाते. त्यांच्याकडे मिरची कांडप यंत्र आहे. घरच्या घरी चटणी आणि काळ्या मसाल्याचे पॅकिंगही करतात. साधारणपणे दरमहा दीड ते पावणेदोन लाख रुपयांची उलाढाल होते. त्यातून सगळा खर्च वजा जाता सरासरी वीस हजारांचा नफा शिल्लक राहतो.

चटणीचा ‘उत्कर्ष' ब्रँड
बाजारपेठेत स्वतःच्या उत्पादनांना स्वतंत्र ओळख तयार होण्यासाठी भारतीताईंनी उत्पादनांच्या विक्रीसाठी उत्कर्ष ब्रॅण्ड तयार केला. पॅकिंगवर ‘अस्सल सोलापुरी शेंगा चटणी` असा लोगोही छापला. त्यामुळे ग्राहकांकडून लागलीच पसंती मिळते. ब्रँडचा खुबीने केलेला वापर आणि मार्केटिंगची साखळी, यामुळे उत्पादनांना वाढती मागणी आहे. 

शहरी मार्केटमधून मागणी
पुण्यातील विमाननगर परिसरातील हॉटेल्स, मुंबईतील दादर, लालबाग, परळ, कळवा या भागातून काही किरकोळ विक्रेते आणि घरगुती ग्राहकांकडून भारतीताईंच्या चटण्या, मसाल्यास चांगली मागणी आहे. त्याशिवाय सोलापूर जिल्ह्यातून इचलकरंजी शहरात स्थायिक झालेल्या कुटुंबांकडून सोलापुरी चटणीची मागणी असते. अलीकडच्या काही महिन्यात चटण्या, मसाल्याच्या मागणीत सात्यत्याने वाढ होत आहे.

मुलाला दिले चांगले शिक्षण
भारतीताईंच्या कष्टामुळेच आज पाटील कुटुंब आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर झाले. पतीही त्यांना प्रक्रिया उद्योगात मदत करतात. व्यवसायाच्या आर्थिक उलाढालीवरच भारतीताईंनी मुलगा शार्दुलला सिव्हिल डिप्लोमाचे शिक्षण दिले. नुकतीच त्यांची नेदरलॅंडमधील कंपनीमध्ये निवड झाली. छोट्याशा व्यवसायाच्या बळावरच भारतीताईंनी घेतलेली झेप निश्‍चितच कौतुकास्पद आहे.

संपर्क : सौ. भारती पाटील, ९७६५७०६७७७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com