Rajendra-Muchandi
Rajendra-Muchandi

झोपडीत राहणारा मजूर झाला प्रगतशील बागायतदार

पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष. इच्छा असूनही प्रगतिशील शेतीची वाट त्यामुळे खुंटलेली. वडिलांनी तब्बल पंचवीस वर्षे तर मुलानेही काही काळ मजुरी केली. पण प्रयत्न, धैर्य, चिकाटी हे गुण असल्यास अडथळे दूर सारून प्रगतीला कारणीभूत ठरतात. अनेक वर्षे झोपडीत राहून आज स्वतःची विकसित केलेली डाळिंब शेती आणि त्या आधारे घर उभारून कुटुंबाला समाधानी बनवणारे शेतकरी म्हणजे सोन्याळ (जि. सांगली) येथील राजेंद्र मधुगौंड्डा मुचंड्डी. त्यांची ही यशकथा.

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्‍याच्या पूर्व भाग दुष्काळीच. तालुक्यातील लोकांना म्हणूनच मजुरीशिवाय दुसरा पर्याय नव्हता. सोन्याळ येथील राजेंद्र मुचंड्डी यांची बोलकी व्यथाच तालुक्याचे चित्रच स्पष्ट करते. आमची साडेतीन एकर माळरान जमीन. पाणी नसल्याने कुसळदेखील उगवत नव्हते. कुटूंब चालवायचं म्हटलं तर पैसा पाहिजे. वडिलांनी तब्बल २५ वर्षे दुसऱ्यांच्या दारी चाकरी केली. त्या वेळी महिन्याला ३० रुपये हाती पडायचे. कुटुंबाची फरफट व्हायची. झोपडीत राहायचो. जगण्यासाठी पैसा लागतो एवढचं माहिती होतं. केवळ वडिलांच्या उत्पन्नातून उदरनिर्वाह करणं कठीण होतं. मग आम्ही भावांनी डाळिंबाच्या बागेत मोलमजुरी करायला सुरवात केली. 

मजुरी करता करता प्रशिक्षण
तशी आमची शेती होतीच. पण पाण्याशिवाय काहीच शक्य नव्हतं. सलग सात वर्षे डाळिंब बागेत मजुरीचे कष्ट उपसणे सुरू होते. डाळिंबाची काढणी, पॅकिंग करणे ही कामे अंगवळणी पडली होती. हळूहळू कोणता बहार धरायचा, कशा पद्धतीने डाळिंब पिकाची निगा राखायची याचे ज्ञान मिळवत गेलो. आपल्याच माळरानात आपणच डाळिंब पिकवली तर? असा विचार पुढे येऊ लागला. त्यातून आर्थिक झळा कमी होणार होत्या. मग त्यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले. राजेंद्र सांगत होते. कधी तरी कर्नाटक भागातील डाळिंबाच्या शेतात जाऊन काम केल्यानं तिथल्या काही गोष्टी शिकायला मिळाल्या. पिकाचा अभ्यास पक्का होत गेला.  
 
जगण्याची उमेद, डाळिंबाचा श्रीगणेशा
खरं तर पुढं कसलाच आशावाद दिसत नव्हता. पण कुटूंब चालवणं भाग होतं. जगण्याची उमेद हवी तरच आपण यशस्वी होऊ हे सांगताना मधुगौंडा मुचंड्डी (वय ६८)  यांच्या डोळ्यात अश्रू तरारले होते. 

सन २०१० च्या दरम्यान अखेर डाळिंब लागवडीचे धाडस केले. भगवा वाणाची सुमारे दीड एकरांत लागवड झाली. पाणी नसलं तरी मागे हटून चालणार नव्हते. सुरवातीच्या काळात टॅंकरने पाणी देऊन बाग जगविली. हळूहळू बाग उत्पादन देऊ लागली. डाळिंबातलं उत्पन्न आणि आत्तापर्यंत पैपे गोळा केलेलं एकत्र करायला सुरवात केली.
 
जिद्दीने काम करीत राहिलो 
पाणीटंचाईचं सावट कायम होतंच. त्यामुळे बोअर घेण्याचा निर्णय घेतला. पण पाणीच लागले नाही. त्यामुळे निराश झालो. तरीपण जिद्द सोडली नाही. सुमारे ४० हून अधिक बोअरवेल शेतात मारल्या. जमवलेले काही लाख रुपये त्यात खर्च केले. अखेर प्रयत्नांना यश आलं. दोन बोअर्सना पाणी लागलं. आनंद झाला. पण हे पाणी कायमस्वरुपी टिकेल का याची शाश्‍वती नव्हती. त्यामुळे स्वःखर्चातून शेततळे उभारण्याचे ठरवले. बोअरचे पाणी त्यामध्ये साठवून शेतीला ते देण्याचे नियोजन केले आहे. राजेंद्र यांनी आपली कथा विषद केली.

ज्ञानाची देवाणघेवाण
आज सुमारे आठ वर्षांच्या अथक प्रयत्नांतून मुचंड्डी डाळिंबाच्या शेतीत स्थिरस्थावर झाले आहेत. परिसरातील मित्र मंडळी त्यांच्या शेतात एकत्र येतात. व्यवस्थापनाबाबत सविस्तर चर्चा होते. कोणत्या बहारात काय दर मिळतो, कोणत्या व्यापाऱ्याकडे विक्री करायची अशा चर्चा होतात. पाणी, खत व्यवस्थापन हेदेखील त्यात विषय असतात. आज मुचंड्डी दरवर्षी मृग बहारातील डाळिंब घेतात. उशिरा हस्त बहार घेण्यासंबंधीचा प्रयोगही त्यांनी ॲग्रोवनमध्ये वाचला. त्यानुसार आटपाडी तालुक्‍यातील प्रगतशील शेतकऱ्यांची भेट घेऊन अधिक माहिती घेणे पसंत केले. अभ्यास करून हादेखील प्रयत्न यंदा केला आहे. आपल्या शेतीतील जडणघडणीत ॲग्रोवन व मित्रपरिवार यांचा मोलाचा वाटा असल्याचे ते सांगतात. आज दीड एकरातील डाळिंब हेच त्यांचे पैसे देणारे पीक आहे. जोडीला खरीप, रब्बी हंगामातील पिके असतातच. 

अनेक वर्षे झोपडीत राहिलो. मजुरी केली. आता स्वतःची बाग कसतो. पाण्याचा आधार झाला आहे. शेततळे उभारले आहे. पक्के घर बांधले आहे. दोन टू व्हीलर्स घेतल्या आहेत. कुटुंबाला सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. समाधान कमावले आहे. तेच आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. शेतीत कधी नफा तर कधी तोटा होत असतोच. पण आपण न थांबता पुढे जात राहिले पाहिजे.  
 - राजेंद्र मुचंड्डी, ९७६४६०५३२१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com